'धर्मेंद्र प्रधान नव्हे, आता सरकारच बदलायचं'; सोनम वांगचुक आंदोलनाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल (photo credit - social media)
दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अन्नत्याग आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असताना मुंबईतही या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. आझाद मैदानात झालेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी न करता केंद्रातील सरकार बदलण्याचे आवाहन केले.
या आंदोलनाला आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी राज्यभरातून नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात आले.
भाषणादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, “आंदोलनात दिसलेले “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” हे फलक अपुरे आहेत. त्यांच्या मते, केवळ एका मंत्र्याचा राजीनामा हा उपाय नसून रोजगार, शिक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात व्यापक लढा उभा राहणे गरजेचे आहे.”
Uddhav Thackeray Protest : उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा! आंदोलनावरून ठाकरे विरुद्ध सदावर्ते वाद
ते पुढे म्हणाले की, “हा संघर्ष केवळ सोनम वांगचुक किंवा अभिजित दीपके यांच्यापुरता मर्यादित नाही. देशातील विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी हा लढा आहे.” सरकारमध्ये बदल होईपर्यंत हा जनआक्रोश कायम ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आपण या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने स्वतः नेतृत्व स्वीकारावे, हा संदेश देण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. लोकशाहीच्या मार्गाने जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन करत त्यांनी संघर्ष अधिक व्यापक करण्याची भूमिका मांडली.
दरम्यान, दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
‘हे तर लोकशाहीचे सीरियल रेपिस्ट’; सहा खासदारांच्या विलिनीकरणावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात






