महापालिकेतील पराभवाने काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज (संग्रहित फोटो)
सोलापूर : सोलापूर महापालिकेवर जवळपास अर्धशतक सत्ता गाजवणार्या काँग्रेसला शहरात ‘बुरे दिन’ आले असून, अवघे दोनच नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रभाग १५ मधील उमेदवार चेतन नरोटे आणि प्रभाग १६ मधील उमेदवार प्रा. नरसिंह आसादे हेच पक्षाचे विजयी उमेदवार ठरले. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा केवळ २३८ मतांच्या फरकाने विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल ४८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, अवघ्या दोन जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून रणनीती आखण्यात आली होती. मात्र, ही रणनिती सपशेल फेल ठरली. ऐनवेळी निवडणुकीच्या काळात पक्षाला अनेक माजी नगरसेवकांनी केलेला रामराम, संघटनात्मक कमजोरी, मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेले अपयश आणि समन्वयाचा अभाव, तरुण मतदारांचा पक्षाकडे आकर्षित करण्यात आलेले अपयश, कार्यकर्त्यांची नवी फळी निर्माण करण्यात आलेले अपयश, शहरातील प्रश्नांबाबत उदासीनता, विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्यात आलेले अपयश ही या पराभवामागील कारणे आहेत.
हेदेखील वाचा : ZP Election 2026 : कोल्हापुरात रणसंग्राम; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चिन्हे,जनता दल, भाजपा युतीचे संकेत
२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी झाले होते. त्या तुलनेत यावेळी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झाल्या. मात्र, गेल्या काही काळात पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या घटली. सोलापूर शहरात काँग्रेसची पारंपरिक मतपेढी कमकुवत होत चालली आहे. काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची गरज असून, संघटन मजबूत करणे, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे आणि मतदारांशी थेट संवाद वाढवणे, ही काँग्रेससमोरील मोठी आव्हाने आहेत.
मुंबईत भाजपचाच महापौर होणार
राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता महापालिकांमध्ये महापौरपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही, मात्र, राजकीय पक्षांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण जोरात सुरू आहे. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : राज्यात महापालिका निवडणुका संपल्या; आता महापौरपदासाठी तयारी सुरु, ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय…






