Maharashtra Fishing Ban Till August 15 : महाराष्ट्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी; नितेश राणेंची गोव्याकडे मदतीची मागणी
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की, काल गोव्याचे मा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागाने घेतलेल्या १५ ऑगस्टपर्यंतच्या मासेमारी बंदीच्या निर्णयाबाबत त्यांना माहिती दिली.
या काळात गोवा सरकारनेही महाराष्ट्राला सहकार्य करावे आणि गोव्यातील कोणत्याही मच्छीमारांकडून महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मासेमारी केली जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याचे आश्वासन दिले. या सहकार्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी यांचे मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातील किनारपट्टी भागातील मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. या आदेशानुसार, राज्याच्या किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल, म्हणजेच अंदाजे २४ किलोमीटरच्या परिसरात व्यावसायिक आणि यांत्रिक मासेमारीवर बंदी घालण्यात येईल. ही बंदी केंद्र सरकारने लागू केलेल्या आणि ३१ जुलै रोजी संपलेल्या मानक बंदीच्या पलीकडे आहे.
मात्र, पारंपरिक मच्छिमारांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. अधिकृत लहान, बिगर-मोटार बोटी वापरणारे पारंपरिक मच्छिमार किनारपट्टीजवळील स्थानिक पाण्यात मासेमारी करू शकतात.
दरम्यान, १ ऑगस्टपासून यांत्रिक खोल समुद्रातील मासेमारी बोटींना १२ सागरी मैलांच्या पलीकडे खुल्या समुद्रात मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बंदीचा उद्देश सागरी जीवांना प्रजननासाठी वेळ देणे आणि माशांचा साठा वाढवणे हा आहे, जेणेकरून मच्छिमारांना भविष्यात अधिक चांगला नफा मिळवता येईल.






