Maharashtra Breaking News Updates Today
Maharashtra to National And International Breaking News: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदाच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आले. विद्या चव्हाण आणि महेश तपासेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बाजू मांडणार आहेत.
Supreme Court On Live In Relationship: जोडीदार किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून होणारा छळ किंवा अत्याचार यांसारख्या प्रकरणांमध्ये, लिव्ह-इन जोडीदाराला पत्नीप्रमाणेच अधिकार असतील, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच एखादे लिव्ह-इन रिलेशनशिप हे लग्नाच्या स्वरूपाचे असेल आणि दोन्ही बाजूंचा लग्न करण्याचा उद्देश असेल तर भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ जे पती किंवा त्याच्च्या नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या क्रूरतेशी संबंधित आहे ते आता लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनाही लागू होईल, अस कोर्टाने सोमवारी म्हटले. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, कलम ४९८-अ अशा लिव्ह-इन संबंधांनाही लागू होऊ शकते जे वैवाहिक नात्यासारखे प्रस्थापित झाले आहेत. वाचा सविस्तर-
04 Aug 2026 06:55 PM (IST)
Mumbai Weather Update: जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईसह आसपासच्या उपनगरांमध्ये (Mumbai Weather) पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज (४ ऑगस्ट) पासून मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता असून पारा ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.
04 Aug 2026 06:51 PM (IST)
Mumbai Metro: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) संचलित मेट्रो नेटवर्कने ३० कोटी (३०० दशलक्ष) प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठत सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ३ ऑगस्ट २०२६ रोजी गाठलेला हा टप्पा म्हणजे मुंबईकरांनी मेट्रो सेवेला दिलेल्या वाढत्या पसंतीचा आणि विश्वासाचा ठोस पुरावा मानला जात आहे.
04 Aug 2026 06:39 PM (IST)
India Vs Sri Lanka Test Series: भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळण्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. केएल राहुल उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. भारत आणि श्रीलंका दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही सिरिज महत्वाची आहे. दरम्यान भारती संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे.
04 Aug 2026 06:31 PM (IST)
मुंबई: मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या ‘सक्षम कौशल्य जनगणना’ या अभिनव उपक्रमाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री मंडळातील सदस्य,मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई उपनगर चे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यावेळी उपस्थित होते.
04 Aug 2026 06:19 PM (IST)
पुणे/सुनयना सोनवणे: महिलांना स्वावलंबी बनविणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘पिंक ई-ऑटो’ योजनेची पुण्यातील अंमलबजावणी अत्यंत संथ असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यासाठी चार हजार लाभार्थींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असतानाही योजना सुरू होऊन दोन वर्षे उलटली तरी केवळ १७ महिलांनीच अर्ज प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिलांना मिळणारे अनुदान २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढविले असले, तरी राज्यातील लाभार्थ्यांचे उद्दिष्ट १० हजारांवरून पाच हजारांपर्यंत कमी केले आहे.
04 Aug 2026 06:11 PM (IST)
Pakistan News : गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहेत. या निदर्शनांमध्ये स्थानिक रहिवासी थेट सरकार आणि पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करत आहेत. दरम्यान, या अशांततेमुळे पाकिस्तानातील उजव्या विचारसरणीच्या गटांमध्ये आणि अतिरेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे. झैद हमीद , लाल टोपी म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानी कार्यकर्ते यांनी या संकटावर एक वादग्रस्त विधान केले आहे.
04 Aug 2026 05:58 PM (IST)
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी FDA ने उचललं मोठं पाऊल. शाळेच्या 500 मीटर परिसरात आता जंक फूड विक्रीवर बंदी. "विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र FDA ने मोठा निर्णय घेतला आहे. शाळेच्या 500 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे." "वडापाव, चिप्स, कोल्डड्रिंक्स यांसारख्या पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आणण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना सकस आहाराकडे वळवण्याचा आहे."
04 Aug 2026 05:47 PM (IST)
नालासोपारा शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि गटाराच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी फक्त नावाला झाल्याचा नागरिकांचा आरोप." नालासोपारा पूर्वेतील रस्ते आणि रस्त्यांवर पडलेले असे भयंकर खड्ड्यांच्या समस्येवरून पुन्हा एकदा नागरिकांचा संताप वाढला आहे. खराब रस्ते, साचलेले गटाराचे पाणी आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक शंकर सुर्वे यांनी महापालिकेवर गंभीर आरोप करत लवकरच मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या आरोपांवर महापालिकेची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
04 Aug 2026 05:35 PM (IST)
सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालय आवारात आक्रोश ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी मागील दीड वर्षातील प्रलंबित प्रस्ताव, कामगारांचे क्लेम (दावे) याबाबत कामगार अधिकाऱ्यांना विचारणा करीत कामगार आक्रमक झाले.
04 Aug 2026 05:23 PM (IST)
टिटवाळ्यातील केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्रातच मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे टिटवाळ्यातील मोहिली जलशुद्धीकरण केंद्र सध्या पाण्याच्या अपव्ययामुळे चर्चेत आले आहे. केंद्रातील गळती, तांत्रिक बिघाड आणि देखभालीअभावी दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणे आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत जलशुद्धीकरण केंद्रातच पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
04 Aug 2026 05:08 PM (IST)
वसईतील एव्हरशाईन रोड परिसरात महापालिकेच्या बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात बसमधील सुमारे १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. अधिक तपशील तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे.
04 Aug 2026 04:47 PM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)चे सह-सरकार्यवाह अतुल लिमये यांनी जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनाला ‘राष्ट्रविरोधी’ आणि ‘संविधानविरोधी’ म्हणत जोरदार टिका केली होती. लिमये यांच्या टिकेवर आता CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी RSS आणि अतुल लिमयेंना प्रत्युत्तर दिले आहे. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाला राष्ट्रविरोधी म्हणण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणताही नैतिक अधिकार नाहीत, असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...
04 Aug 2026 04:37 PM (IST)
Donald Trump: अमेरिकेच्या न्याय विभागाने (Department of Justice – DoJ) नैसर्गिकरित्या अमेरिकेचे नागरिकत्व मिळवलेल्या २५ व्यक्तींचे नागरिकत्व रद्द (Denaturalization) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या यादीत भारतीय वंशाचे ६५ वर्षीय नरिंदर सिंह यांचाही समावेश आहे. या सर्वांवर नागरिकत्व मिळवताना खोटी माहिती देणे, बनावट ओळख वापरणे किंवा गंभीर गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे.
04 Aug 2026 04:27 PM (IST)
जालना महानगरपालिकेच्या शाळांमधील गंभीर अनागोंदी, शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे, विद्यार्थ्यांना अपुऱ्या मूलभूत सुविधा आणि दर्जाहीन शिक्षणाच्या तक्रारींची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली असून, येत्या ७ ऑगस्ट रोजी आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व सचिव स्वतः जालन्यात येऊन सर्व परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर...
04 Aug 2026 04:17 PM (IST)
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकरी कल्याण, ऊर्जा, न्यायव्यवस्था आणि प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत. वाचा सविस्तर...
04 Aug 2026 04:10 PM (IST)
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील स्वातंत्र्यवादी चळवळीने पुन्हा एकदा वेग घेतला असून, ११ ऑगस्ट हा ‘बलुचिस्तान स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळण्याचे आवाहन काही बलुच राष्ट्रवादी संघटनांनी केले आहे. या घोषणेमुळे पाकिस्तानमध्ये राजकीय आणि सुरक्षा पातळीवर खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार, सुरक्षा कारवाया आणि वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. वाचा सविस्तर...
04 Aug 2026 03:55 PM (IST)
US H-1B Visa : जर तुम्ही अमेरिकेत काम करत असाल किंवा अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. अमेरिकन सरकार H-1B व्हिसाच्या मुदतवाढीवर नवीन शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. जर हा प्रस्ताव लागू झाला, तर कंपन्यांना त्यांच्या परदेशी कर्मचाऱ्यांच्या H-1B व्हिसाचे नूतनीकरण करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो. नेमका काय आहे प्रस्ताव ? आणि काय अडचणी वाढणा आहेत?
04 Aug 2026 03:49 PM (IST)
Civil Police Constable: गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि त्यांच्या आंदोलनांची चर्चा सुरूच आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपर लीकविरोधात झालेली विद्यार्थ्यांची आंदोलने अद्यापही चर्चेत आहेत. पेपर लीक आणि निकाल जाहीर झाल्यानंतर नीटच्या ओएमआर (OMR) शीटवरूनही वाद सुरू आहे. दरम्यान, OMR शीटशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले असून, ते वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे नसून पोलिस भरती परीक्षेचे आहे.
04 Aug 2026 03:42 PM (IST)
गुहागर/दिनेश चव्हाण: कोयना जलविद्युत प्रकल्पातून वाशिष्टी नदीत सोडले जाणारे पाणी मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वळविण्याच्या प्रस्तावाची चर्चा सुरू होताच कोकणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रस्तावामुळे वाशिष्टी नदीचा बारमाही प्रवाह, नदीतील मत्स्यसंपदा, भूजल पातळी, शेती, पिण्याचा पाणीपुरवठा आणि नदीपात्रातील पर्यावरणीय संतुलन यावर काय परिणाम होणार, याबाबत नागरिक, शेतकरी, मत्स्यव्यवसायिक आणि पर्यावरण अभ्यासकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
04 Aug 2026 03:30 PM (IST)
गुजरात: गुजरातमधील राजकोटमध्ये नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावाने भररस्त्यात कारमधून बाहेर बोलावून ४२ वर्षीय व्यक्तीवर चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. कौटुंबिक वाद आणि कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य आरोपीला काही तासांतच अटक करण्यात आली आहे.
04 Aug 2026 03:15 PM (IST)
राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेशाद्वारे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर काही अटी व शर्ती लागू करत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर पुण्यातील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आणि मॉडर्न महाविद्यालय परिसरात विद्यार्थी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया.
04 Aug 2026 03:01 PM (IST)
राज्यातील राजकीय वातावरणात आता आणखी एक ठिणगी पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोरादार वाद रंगू लागला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर सोशल मीडियावर बोचरी टीका केल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस पक्ष वादात सापडला असून यावरून राष्ट्रवादीने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.
04 Aug 2026 02:59 PM (IST)
इतरांचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलीस दलातच मोठा घोटाळा उघडकीस आलाय. पोलीस दलातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच हा कोट्यवधींचा वेतन घोटाळा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बनावट पोलीस तयार करून त्यांच्या बँक खात्यांवर पगाराची रक्कम वळवण्यात आली. याद्वारे शासनाचे साडेसहा कोटी रुपये लाटण्यात आल्याचं समजतंय. या गंभीर प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. साम टीव्हीने यांसदर्भात वृत्त दिले आहे.
04 Aug 2026 02:50 PM (IST)
पुण्यातील भिडे पूल आजही वाहतुकीसाठी बंद आहे. खडकवासला धरणातून नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून, भिडे पूल अद्यापही पाण्याखाली असून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनानं केल आहे.
04 Aug 2026 02:39 PM (IST)
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
04 Aug 2026 02:30 PM (IST)
परमबीर सिंग यांच्याविरोधात इतके पुरावे असतानाही एनआयएच्या आरोपपत्रात त्यांचे नाव आरोपी म्हणून का नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. चार वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवण्यात आली होती. एटीएसच्या तपासानंतर तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंग आरोपी आढळले होते. त्यानंतर मी त्यांची बदली केली आणि पुढे त्यांना निलंबितही केले होते. एनआयएच्या तपासातही परमबीर सिंग यांच्याविरोधात पुरावे आढळले आहेत, असे देशमुखांनी सांगितले.
04 Aug 2026 02:21 PM (IST)
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील, अशी पोस्ट सोशल मीडियात केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, काँग्रेसने आपला इतिहास तपासून पाहावा. काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे हे यातून दिसते. पत्रकार परिषद नसेल हे आधीच स्पष्टपणे सांगितलं होतं. बैठकीतील माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देत होत्या. भयंकर दुःख पटवून दादांचा वारसा चालविण्यासाठी त्या पुढे आल्या. त्या भावूक झाल्या होत्या, हे मी पाहिलं, म्हणून मी पत्रकारांना थांबवलं, असे मुंडे म्हणाले आहेत.
04 Aug 2026 02:10 PM (IST)
वाढीव घरपट्टीच्या विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. सांगली-मिरज-कुपवाड शहर बंद पाळत सांगली महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्याधारित करप्रणालीअंतर्गत घरपट्टी लागू केली आहे. मात्र, ही घरपट्टी वाढ अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
04 Aug 2026 02:00 PM (IST)
भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री 2026-27 मध्ये मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हॉरर, ऐतिहासिक, थ्रिलर, अॅक्शन आणि बायोपिक अशा वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांमधून या अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आलिया भट्ट, तमन्ना भाटिया, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक अभिनेत्रींचे आगामी प्रोजेक्ट्स सध्या चर्चेत आहेत. आता प्रश्न आहे तो म्हणजे 2026-27 मध्ये कोणत्या अभिनेत्रीच्या चित्रपटांची प्रेक्षकांना सर्वाधिक उत्सुकता आहे?c
04 Aug 2026 01:55 PM (IST)
राज्यातील दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना आंबेगावचे आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. “दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर व्यवहाराशी माझा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून कायमची निवृत्ती स्वीकारेन,” अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशातून वळसे पाटील यांनी या विषयावर प्रथमच सविस्तर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यातील काही विरोधकांकडून दूध भेसळ प्रकरणाशी त्यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी हे आरोप पूर्णपणे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
04 Aug 2026 01:50 PM (IST)
“भाजपला वाटते की कोणालाही मुख्यमंत्री किंवा मंत्री बनवले तरी जनता स्वीकारेल. पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अशीच पद्धत दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहेत, असा आरोप आम्ही वारंवार करत आलो आहोत. मतदारांना गृहीत धरल्याचा फटका भाजपला बसला,” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. देशातील सध्याच्या राजकीय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घसरत असल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे, असा दावाही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला.
04 Aug 2026 01:45 PM (IST)
धुळे ते जळगावदरम्यान फागणे-तरसोद या राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधलेल्या चारपदरी रस्त्याची अत्यंत निकृष्ट दर्जामुळे अवघ्या १५ दिवसांतच दुरवस्था झाल्याचा गंभीर आरोप करत एसक्यूएम ग्रेड-२ अभियंता विजय हिलाल मंगळे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालकांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये संबंधित कंत्राटदार, पर्यवेक्षक अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, भविष्यात अपघात होऊन जीवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
04 Aug 2026 01:30 PM (IST)
तमिळनाडूचे डीएमके नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अभिनेत्री तृषा यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.ही घटना कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर तंजावूर येथे आयोजित डीएमकेच्या आंदोलनादरम्यान घडली. सभेत बोलताना उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर कथितरित्या द्विअर्थी आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला.
04 Aug 2026 01:25 PM (IST)
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज KL Rahul आणि आयपीएल फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांच्यातील वाद काही गुपित नाही. राहुलने या प्रकरणी अद्याप आपले मत व्यक्त केले नव्हते, पण आता त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने गोएंकांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल म्हणाला की, दोन महिन्यांच्या आयपीएलमुळे तो जितका मानसिकदृष्ट्या थकून गेला होता, तितका तो १० महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे नाही.
04 Aug 2026 01:20 PM (IST)
आकिब नबी, हे नाव आतापर्यंत सर्वांनाच परिचित असेल. जम्मू आणि काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाने भारतीय संघात अनपेक्षितपणे प्रवेश केला. जसप्रीत बुमराह जखमी होता आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नबीची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड केली. हा एक असा खेळाडू आहे ज्याने पाच आयपीएल सामन्यांमध्ये एकही बळी घेतला नाही. त्यामुळे, अनेक भारतीय चाहते त्याच्या प्रतिभेबद्दल अनभिज्ञ असतील, म्हणून आम्ही तुम्हाला त्याची ओळख या लेखाद्वारे करून देत आहोत.
04 Aug 2026 01:15 PM (IST)
देशात राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात सत्ताधीश असलेल्या भाजपच्या कोरेगावं पंचायत समितीच्या वाठार स्टेशन गणाच्या महिला सदस्याला निधी वाटपात राष्ट्रवादी कडून दुजाभाव मिळत असल्याचा आरोप भाजप च्या कोरेगाव पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांनी केला आहे. या बाबत तत्काळ सुधारणा न केल्यास लवकरच जन आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी आज कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच कोरेगाव मधील पत्रकार यांना पंचायत समिती कारभराची माहिती देण्याबाबत तसेच मासिक सभेत बसण्यासाठी विरोध करत असल्याबाबत त्यांनी जाहीर निषेध केला आहे.
04 Aug 2026 01:05 PM (IST)
तमिळनाडूचे डीएमके नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अभिनेत्री तृषा यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर तंजावूर येथे आयोजित डीएमकेच्या आंदोलनादरम्यान घडली. सभेत बोलताना उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर कथितरित्या द्विअर्थी आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला. त्याच रॅलीदरम्यान अभिनेत्री तृषाविरोधातही कथित आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा आरोप आहे.
04 Aug 2026 12:52 PM (IST)
भारताच्या शैक्षणिक पटलावर आपले नाव सुवर्णक्षरांनी कोरणारे आणि उच्च शिक्षणाचा पाया तळागाळापर्यंत पोहोचवणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आज त्यांनी जगाला अखेरचा निरोप दिला असला तरी त्यांचे शैक्षणिक कार्य प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जे अभूतपूर्व कार्य उभे केले, ते आज लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे.
04 Aug 2026 12:48 PM (IST)
पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून १४ जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सिंहगड रोड परिसरातील पानमळा येथे घडला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, तर पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शुभम राजू घोडके (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मेहुणा विष्णू शिवाजी शिरसाठ (वय २२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अर्जुन कांबळे, अनिकेत कांबळे, गणेश कदम, मुंकुद राजगुरू आणि अंकुश काळे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वृंदावन नर्सरीजवळील पानमळा परिसरात घडली आहे.
04 Aug 2026 12:36 PM (IST)
देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या प्रेयसीची चाकूने निर्घृण हत्या करणाऱ्या प्रियकराला पुणे न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तरुणीला वाचविण्यासाठी आरोपीकडून चाकू हिसकावून घेताना जखमी झालेल्या पोलिस अंमलदारांसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी नोंदविलेली साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी क्षीरसागर यांनी हा निकाल दिला आहे. बुधवार पेठेत ही घटना २३ मे २०१७ मध्ये रात्री घडली होती. सुखदेव रामदास मडावी (वय ३४, रा. वडरवाडी, मूळ रा. यवतमाळ) याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. संबंध तोडल्याच्या वादातून त्याने २२ वर्षीय तरुणीचा खून केला होता.
04 Aug 2026 12:24 PM (IST)
नातेवाईक महिलेला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत चौघांनी तरुणाच्या घरात प्रवेश करून त्याच्यासह वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. फुरसुंगीतील संकेत विहारमध्ये घडलेल्या या घटनेत पिता-पुत्र दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी याज्ञवल्क्य मदनलाल तिवारी (वय २२), आदर्श शारदा तिवारी (दोघे रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी), आशीष मिश्रा आणि एका अनोळखी व्यक्तीवर फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुज राजेश पांडे (वय २६, रा. संकेत विहार, फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे.
04 Aug 2026 12:12 PM (IST)
मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या तपासातून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी अमित लाड जाधव (वय २०), वसंत अंकुश जाधव (वय २५) आणि सुनील लहू जाधव (वय २५) यांच्यासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
04 Aug 2026 11:45 AM (IST)
मुंबई पोलिस दलातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिस दलात बनावट पोलिसांच्या नावे तब्बल ६.५ कोटींचा वेतन घोटाळा समोर आला आहे. पोलिस दलात कार्यरत नसलेल्या बनावट व्यक्तींना पोलिस कर्मचारी दाखवून त्यांच्या नावे पगाराची रक्कम लाटण्यात आली. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
04 Aug 2026 11:35 AM (IST)
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घोटाळ्याचे पडसाद देशभरात उमटल्यानंतर तरुण आणि विद्यार्थ्यांच्या ‘जेन-जी’ (Gen Z) पिढीने याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली (CJP Protest) दिल्लीमध्ये तब्बल 36 दिवस हे ऐतिहासिक आंदोलन चालले. या आंदोलनादरम्यान असंख्य तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने यावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
04 Aug 2026 11:24 AM (IST)
भारतीय डाक विभागात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डाक विभागात १० वी पास पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ‘इंडिया पोस्ट स्टाफ कार ड्रायव्हर भरती २०२६’ अंतर्गत अर्ज करू शकतात. बंगळुरू येथील मेल मोटर सर्व्हिसमध्ये डाक विभागातर्फे स्टाफ कार ड्रायव्हरच्या ११ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. डाक विभागातर्फे हे पद प्रतिनियुक्ती किंवा विलीनीकरणाच्या आधारावर भरले जाईल. चला तर मग, इंडिया पोस्ट स्टाफ कार ड्रायव्हर भरती २०२६ बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
04 Aug 2026 10:20 AM (IST)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडून आला आहे. व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या कापडात नवजात मुल एका घराच्या दरवाजाबाहेर फर्शीवर पडलेली दिसते. मुलगी झापेत नसते तर पूर्ण शुद्धीत ती आजूबाजूचे दृष्य पाहत असते. मुलीच्या आजूबाजूला काही लोक जमलेली दिसतात. यातीलच एक व्यक्ती घटनेचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद करुन सोशल मिडियावर शेअर करतो. इंटरनेटवर दावा केला जात आहे की, मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला सोडून दिले. व्हिडिओमध्ये जमिनीवर पडलेल्या चिमुकल्या मुलीला पाहून अनेकांना तिच्या परिस्थितीसाठी वाईट वाटले. या काही सेकंदाच्या क्लिपमध्ये मुलगी आजूबाजूच्या लोकांना पाहून निखळपणे हसतानाही दिसते. तिचे हे निरागस हसू अनेकांच्या मनाला भिडते आणि लोक व्हिडिओवर भावूक प्रतिक्रिया व्यक्त करु लागतात. तथापि, या व्हिडिओतील दाव्याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
04 Aug 2026 10:10 AM (IST)
लिव्हिजनवरील लोकप्रिय स्टंट-आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 15′ सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या एका धोकादायक टास्कमुळे शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्पर्धक गौरव खन्ना याने टास्कनंतर आपल्या पाठीवरील जखमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी शोच्या निर्मात्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
04 Aug 2026 10:00 AM (IST)
जयपूरमध्ये रॅली काढणाऱ्या राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यापूर्वी, आंदोलक आणि पश्चिम डीसीपी प्रशांत किरण यांच्यात झटापट झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे वापरले. यादरम्यान, काही लोकांनी पाण्याचे फवारे मारणाऱ्या व्हॅनमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. रॅलीजवळून जाणारी एक रुग्णवाहिकाही अडकली. मात्र, आंदोलकांनी रस्ता मोकळा करून तिला बाहेर काढले.
04 Aug 2026 09:36 AM (IST)
BIHAR POLITICS: बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघात जन सुराज्य पक्षाचे प्रमुख आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी धक्कातंत्राचा वापर करत मोठा विजय मिळवला आहे. भाजपचे नेते नितीन नबीन यांच्या या पारंपरिक आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बांकीपूरच्या गडाला किशोर यांनी लावलेल्या सुरुंगामुळे देशभरात भाजपचा मतदारसंघ सुरक्षित नसल्याचा संदेश गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. बांकीपूर मतदारसंघात अवघे ३४.३ टक्के मतदान झाले होते. या कमी मतदानानंतरही प्रशांत किशोर यांनी मिळवलेल्या अनपेक्षित विजयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांनी यावर अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
04 Aug 2026 09:30 AM (IST)
FUEL PRICE UPDATE: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील 'विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क' म्हणजेच 'विंडफॉल टॅक्स'मध्ये (Windfall Tax) वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली असून सकाळी ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल $84.14 वर पोहोचला होता.
पेट्रोल निर्यात शुल्क: प्रति लिटर ₹२.५ वरून वाढवून ₹३.५ करण्यात आले आहे.
डिझेल निर्यात शुल्क: दोन्ही करांसह प्रति लिटर ₹१५.५ वरून थेट ₹२५.५ प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आले आहे.






