देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः, संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात जयंत पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, याची चर्चा सुरू आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षात वेगवान घडामोडी घडत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याला काही काही तास उलटत नाहीत तोच ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या भेटीवेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि अर्थमंत्रीपदाबाबत तर्क-वितर्कांना वेग आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः, संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात जयंत पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, याची चर्चा सुरू आहे. पण जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या या संदर्भात फक्त राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कच काढले जात आहे.
राजकीय सूत्रांनुसार, केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला दोन मंत्रिपदे मिळू शकतात, अशी चर्चा आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास अर्थखाते कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडे देण्यास शिवसेनेतील काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याबाबतही कोणतीही अधिकृत भूमिका किंवा निर्णय समोर आलेला नाही.
शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार आणि जयंत पाटील यांना राज्याचे अर्थमंत्रीपद मिळणार, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमागे कोणतेही वेगळे राजकीय समीकरण असेल, असे मला वाटत नाही. जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी नेते असून ते सात वेळा विधिमंडळासाठी निवडून आले आहेत. त्यांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना विविध कारणांसाठी भेटू शकतात. या भेटीत मला काहीही वावगे वाटत नाही.”






