पोलिस संरक्षण नाकारत जरांगेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; 'धनंजय मुंडेंना...' (संग्रहित फोटो)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारवर वेळोवेळी आरोप करण्यात येत आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्येच आता त्यांनी स्वतःचे पोलिस संरक्षण नाकारले असून, आपले संरक्षण तातडीने काढून घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
मनोज जरांगे यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे यांनी स्वतःचे पोलिस संरक्षण नाकारले असून, आपले संरक्षण तातडीने काढून घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जालन्यात पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे जरांगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्ज देऊन ही अधिकृत विनंती केली आहे.
दरम्यान, जालना पोलिस अधीक्षकांना सादर केलेल्या अर्जामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी थेट आरोप केला. आपल्या घातपाताच्या कटाचे मुख्य सूत्रधार आमदार धनंजय मुंडे हेच आहेत. याच अर्जात त्यांनी, मुंडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे सध्या दिलेले पोलिस संरक्षण तत्काळ काढून घेण्यात यावे, अशी स्पष्ट विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे.
अडीच कोटी रुपयांत कट?
अडीच कोटी रुपयांत कट रचल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली. यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. त्यानुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकजण जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.
माझ्या खुनाचा कट शिजला होता
धनंजय मुंडे यांचा यामागे हात असल्याचा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. ‘माझ्या खुनाचा कट रचला गेला हे सत्य आहे. कट शिजला गेला, यात शंका नाही. यासंदर्भात पोलिस अधीक्षक स्वतः लक्ष घालून आहेत. तपासात दूध का दूध पाणी का पाणी होईल’.
हेदेखील वाचा : Manoj Jarange Murder Conspiracy: मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात मोठी अपडेट; धनंजय मुंडेचा समर्थकाला अटक






