आमदार सुनील शेळके (फोटो- टीम नवराष्ट्र)
राज्यात लवकरच निवडणुका होणार
महायुती स्वबळावर की एकत्र लढणार याकडे लक्ष
सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी केली सुरू
वडगाव मावळ: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत. दरम्यान राज्यात निवडणूक लढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी केली आहे. दरम्यान वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सुनील शेळके बोलत होते.
“युती झाली तर ठीक आहे, पण नाही झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा आहे. जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास हेच आमचे खरं बळ आहे,” असे स्पष्ट आणि ठाम वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले. ते वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते.या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला.
“कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष जिंकतो!”: शेळके यांचा आत्मविश्वास
आमदार शेळके म्हणाले,“राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेच्या मनाशी जोडलेला पक्ष आहे. आम्ही विकासाच्या प्रश्नांवर काम केले आहे.प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर पक्षाचा झेंडा अधिक उंच फडकवावा, हेच आमचे ध्येय आहे.” त्यांनी पुढे सांगितले की,आगामी निवडणुका कोणत्याही परिस्थितीत आम्ही लढणार आहोत. लोकांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये, हे आमचे कर्तव्य आहे.सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आम्ही लढणार आहोत.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी निवडणूक प्रक्रियेत फेरफार आणि घोळ होत असल्याचा आरोप करत आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर आरोप केले होते. त्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.