'सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा'; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघाती हल्ला (संग्रहित फोटो)
नांदेड : ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “उद्याचा हा मोर्चा ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने काढला आहे. उद्याच्या मोर्चामध्ये मी सहभागी होत आहे. 2 ऑक्टोबर रोजी काढलेल्या जीआरच्या विरोधात हा मोर्चा आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही, करण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही’, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दोन वेळा मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याचे महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न कोर्टाने मान्य केले नाहीत. मराठा समाजातला एक वर्ग निजामी मराठा आहे आणि एक रयतेतील मराठा आहे. हे जोपर्यंत मराठा समाज ऐकत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही. निजामी मराठे निजामाबरोबर राहिले आहेत. रयतेतील मराठी शिवाजी महाराजांसोबत राहिले आहेत. सोळाव्या शतकातील भांडण 22 व्या शतकात सुद्धा चालत आहे अशी परिस्थिती आहे.
तसेच, सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा आहे, निजामी मराठा हा रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही. जोपर्यंत तो निजामी मराठ्यांकडून फारकत घेत नाही, तोपर्यंत रयतेतील मराठ्याला आरक्षण मिळणार नाही आणि न्यायही मिळणार नाही. शेतीला सपोर्ट प्राईजचा कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा स्वीकारत नाही. निजामी मराठ्यांपासून हरकत घेतल्याशिवाय रयतेतील मराठ्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही, अशी परिस्थिती आहे.
हेदेखील वाचा : Satara Doctor Death Case: सुषमा अंधारेंनी केले सनसनाटी आरोप! रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला 50 कोटींचा मानहानीचा दावा
20 व्या, 22 व्या 25 व्या वर्षी रयतेतील मराठ्याच्या मुलाच्या मुलीचे लग्न होत होतं. पण, आज तिशी ओलांडली तरी लग्न होत नाही, अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या लढ्यामध्ये ओबीसींच्या बरोबर आहे, असे ते म्हणाले.
जरांगेंचे आंदोलन चुकीचे
जरांगे पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. मनोज जरांगेंचे आंदोलन चुकीचे आहे. ते रयतेतील मराठ्यांच्या लोकसंख्येवर चालतं. त्याचा असणारा सगळा जो निधी आहे, हा निजामी मराठा पूर्ववत असल्यामुळे जरांगे पाटील हे सुद्धा रयतेतील मराठ्यांचे प्रतिनिधी नाही, ते या निजामी मराठ्यांचा प्रतिनिधी आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला.






