आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षातील खासदारांबाबत विश्वास व्यक्त केला आहे. आमचे सर्व खासदार आमच्यासोबत असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“लोक अंधभक्त असतात, पण आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर अंधविश्वास ठेवतो,” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी पक्षातील एकजुटीवर भर दिला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, संसदेत दोन तृतियांश बहुमत मिळवण्यासाठी भाजपकडून देशभरात विरोधी पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमुळे पुन्हा एकदा शिवसेनेत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sanjay Nirupam : ‘अहंकारामुळेच उबाठा बुडेल’; उद्धव ठाकरेंवर संजय निरुपमांचा घणाघात
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र नऊपैकी पाच खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले. बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी “ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना आज ना उद्या पश्चाताप होईल,” असे मत व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीला अनेक खासदार गैरहजर राहिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याची चर्चा आहे. “ज्यांना जायचं आहे त्यांना जबरदस्तीने थांबवण्यात काय अर्थ?” असा सवालही त्यांनी उपस्थित केल्याचे सांगितले जाते.
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाकरे गटाचे खासदार फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ बद्दल उदय सामंतांचे मोठे वक्तव्य






