भाजपमध्ये जायचे नसेल तर आरपीआयमध्ये या
मुंबई : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी शरद पवारांना मोठी राजकीय ऑफर दिली आहे. पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, तर आमच्यासोबत यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आठवले म्हणाले, शरद पवारांना थेट भाजपमध्ये जायचे नसेल, तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक भाजपसोबत घेऊन जाऊ. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसवर टीका करताना आठवले म्हणाले की, पक्षात पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. आगामी काळात काँग्रेसचे राजकीय भविष्य फारसे मजबूत दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी अन्य पर्यायांचा विचार करावा, असेही त्यांनी सुचवले.
शरद पवार गटाचे विलीनीकरणासाठी प्रयत्न
दरम्यान, भाजप नेते आशिष देशमुख यांच्या विधानानेही राजकीय चर्चाना आणखी हवा मिळाली आहे. काही नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
राजकीय चर्चांना उधाण
या विधानांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात संभाव्य आघाड्या, युती आणि पक्षविलीनीकरणाबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या विषयावर संबंधित प्रमुख नेत्यांची अधिकृत भूमिका आणि प्रतिक्रिया काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रामदास आठवले यांनी घेतली उदयनराजेंची भेट
राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिकांबाबत आणि आगामी काळातील राजकीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. जलमंदिर येथे झालेल्या या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थिती, महायुतीतील घटक पक्षांचे स्थान तसेच सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.






