"फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड," विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाचे वारे वाहू लागले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर अनेक प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती देत जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. अश्यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चाललेल्या वादावरून मोठे भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. “देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड बनले आहे,” अश्या शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले आहेत.
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून सरकारवर जोरदार टीका केली. ते यावेळी म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड बनले आहे. निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला एक आश्वासन, ओबीसी समाजाला दुसरे आश्वासन आणि निवडणूक संपल्यानंतर दोघांच्याही हातात फक्त निराशा. प्रश्न सोडवण्याची क्षमता नसल्याने समाज विरुद्ध समाज उभा करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम हे सरकार करत आहे,” असे ते म्हणाले.
“आज महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेला तणाव हा नैसर्गिक नाही, तर सरकारच्या दुटप्पी आणि ढोंगी भूमिकेचा परिणाम आहे. फडणवीस सरकारला प्रश्न सोडवायचे नाहीत, तर प्रश्न जिवंत ठेवायचे आहेत. कारण प्रश्न सुटले तर राजकारण संपेल, पण वाद जिवंत राहिले तर मतांचे गणित जिवंत राहते,” अश्या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड बनले आहे. निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला एक आश्वासन, ओबीसी समाजाला दुसरे आश्वासन आणि निवडणूक संपल्यानंतर दोघांच्याही हातात फक्त निराशा. प्रश्न सोडवण्याची क्षमता नसल्याने समाज विरुद्ध समाज उभा करून स्वतःची… pic.twitter.com/urKHwKcZEn — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 31, 2026
पुढे ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनीही हे समजून घ्यायला हवे की भाजपचे हे सरकार शब्दांचे धनवान पण कृतीचे दिवाळखोर आहे. हे सरकार आश्वासनांचे गाजर दाखवते, बैठका घेते, घोषणा करते आणि शेवटी मराठा-ओबीसी समाजाला एकमेकांसमोर उभे करते. महाराष्ट्रातील दोन्ही समाजांनी आता या राजकीय खेळाला ओळखून खऱ्या दोषींना जाब विचारण्याची वेळ आली आहे.”
“मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच राहिले तर..,” लक्ष्मण हाके यांचा प्रतिआंदोलनाचा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते. अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात ना पाण्याचा थेंब, ना डोक्यावर कुठलेही छत, डोक्याला भगवा रुमाल परिधान करून सकाळी दहा वाजता, शेतात बाज टाकून उपोषणाला बसले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे.राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर अनेक प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती स्वतः जरांगे यांनी आंदोलकांसमोर दिली. सरकारसोबत झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना जरांगे यांनी मोठं विधान केले. ते म्हणाले, सरकारने ५८ लाख कुणबी नोंदी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी ४९ लाख नोंदी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उर्वरित नोंदींची प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मध्यरात्रीच उपोषण सोडलं; चर्चेतून निघाला महत्त्वपूर्ण तोडगा






