संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे बहुतांश अपघात होत असल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे. मात्र, यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचे दिसत आहे. टिळक रस्ता, कुडजे गाव, खडकवासला, नऱ्हे तसेच बोपोडी भागात या घटना घडल्या आहेत.
रवींद्र अनंत जोशी (वय ८०, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत जोशी यांचा मुलगा रोहित (वय ५३) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रवींद्र जोशी हे (दि. १६ जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक भंडारे करत आहेत.
भरधाव चारचाकीची धडक
उत्तमनगर-खडकवासला रस्त्यावरील कुडजे गावाजवळ भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. विवेक विनोद मोहरीर (वय ४४) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी शीतल (वय ४२, रा. गावकुस रिसोर्ट, जांभळी, सांगरुण, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. माहितीनुसार, दुचाकीस्वार विवेक हे (दि. २९ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास खडकवासलातील कुडजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार विवेक यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक निरीक्षक पालवे तपास करत आहेत.
खडकवासला येथे दुचाकीची धडक
खडकवासला येथे दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद गुलजार सिद्दीकी (वय ४७, रा. उत्तमनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत सिद्धीकी यांचे चुलतभाऊ सिंकदर शफी सिद्दीकी (वय ६४) यांनी नांदेड सिटी पोलिसांत तक्रार दिली आहे. माहितीनुसार, दुचाकीस्वार मोहम्मद सिद्दीकी हे (दि. २४ जुलै) रात्री नऊच्या सुमारास खडकवासलातून निघाले होते. स्मशानभूमीजवळील अरुंद रस्त्यावर समोरुन येणाऱ्या भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार मोहम्मद यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक फौजदार भापकर तपास करत आहेत.
नऱ्हेमध्ये दुर्घटना
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे भागात घडली आहे. सुमीत राजेश राठोड (वय १७, रा. अभिनव काॅलेजजवळ, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राठोड याची आई अनुसया (वय ४२) यांनी नऱ्हे पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, वाहन चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार सुमीत हा (दि. ११ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास नऱ्हेतून निघाला होता. त्यावेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सुमीतला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक शिरकुळे तपास करत आहेत.
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
जु्न्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी चौकात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अनिल लक्ष्मण वाघमारे (वय ४५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सुशीला (वय ४२) यांनी खडकी पोलिसांत तक्रार दिली आहे. दुचाकीस्वार अनिल वाघमारे हे (दि. १६ जुलै) सकाळी साडेसहाच्या सुमारास बोपोडी चौकातून निघाले होते. त्यावेळी अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अवजड वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गालफाडे तपास करत आहेत.






