Air Pollution Deaths : वायुप्रदूषण हे केवळ पर्यावरणीय समस्या नसून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका बनले आहे. याचा सर्वाधिक फटका वृद्ध आणि नवजात बालकांवर परिणाम होत आहे.
Air Pollution Deaths : प्रदूषित हवा बनतेय आरोग्याची शत्रू; वृद्ध आणि बालकांवर सर्वाधिक परिणाम, धक्कादायक अहवाल समोर (फोटो सौजन्य: एआय)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
वायुप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक
पीएम २.५ आणि घरगुती प्रदूषणामुळे लाखो मृत्यू
बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगट धोक्यात
Air Pollution Deaths : सुनयना सोनवणे : वायुप्रदूषण हे केवळ पर्यावरणीय समस्या नसून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका बनले आहे. ‘स्टेट ऑफ ग्लोबल रिपोर्ट २०२५’ च्या वार्षिक अहवालातून ओझोन, पीएम २.५ (सूक्ष्म धूलिकण) आणि घरगुती वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या वयोगटनिहाय आकडेवारीतून ही बाब ठळकपणे समोर आली आहे. विशेषतः ६० वर्षांनंतर प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अधिक गंभीर होत असून ७० ते ८५ वर्षे वयोगटातील नागरिकांमध्ये मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
अहवालानुसार, ७५ ते ७९ वर्षे वयोगटात प्रदूषणामुळे सर्वाधिक ३ लाख २२ हजार ४०० मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल ८० ते ८४ वर्षे वयोगटात ३ लाख ९ हजार ८००, तर ८५ ते ८९ वर्षे वयोगटात २ लाख ७८ हजार १०० मृत्यू नोंदवले गेले आहेत. याशिवाय ७० ते ७४ वर्षे वयोगटात २ लाख ७० हजार ४०० आणि ९० ते ९४ वर्षे वयोगटात १ लाख ८४ हजार १०० मृत्यू झाल्याचे चित्र आहे. या आकडेवारीवरून वाढत्या वयाबरोबर प्रदूषणाचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट होते.
पीएम २.५ ठरतोय शत्रू
या मृत्यूंमध्ये पीएम २.५ या सूक्ष्म धूलिकणांचा वाटा सर्वाधिक आहे. वाहनांमधून निघणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे तयार होणारे हे सूक्ष्म कण थेट फुफ्फुसांमध्ये आणि रक्तप्रवाहात प्रवेश करतात. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक, फुफ्फुसांचे आजार, दमा आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
नवजात बालकांवरही परिणाम
आकडेवारीतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे नवजात बालकांवरील परिणाम. ० ते २७ दिवसांच्या बालकांमध्ये सुमारे १ लाख १६ हजार ७०० मृत्यू प्रदूषणाशी संबंधित असल्याचे दिसते. या वयोगटात घरगुती वायुप्रदूषणाचा वाटा सर्वाधिक आहे. पारंपरिक चुली, लाकूड, कोळसा किंवा इतर घन इंधनांच्या वापरामुळे निर्माण होणारा धूर गर्भवती महिला आणि नवजात बालकांसाठी विशेषतः घातक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एक ते अकरा महिन्यांच्या बालकांमध्ये २० हजार ४४०, तर एक ते चार वर्षे वयोगटात ६ हजार ३० मृत्यू नोंदवले गेले आहेत. बालपणानंतर किशोरवय आणि तरुणांमध्ये मृत्यूंची संख्या तुलनेने कमी असली, तरी वयाच्या ४० वर्षांनंतर ती पुन्हा वाढू लागते. ४५ ते ४९ वर्षे वयोगटात २९ हजार ९८०, ५० ते ५४ वर्षे वयोगटात ४७ हजार २५०, ५५ ते ५९ वर्षे वयोगटात ८४ हजार १८०, तर ६० ते ६४ वर्षे वयोगटात १ लाख ४३ हजार मृत्यू नोंदवले गेले आहेत. यानंतर प्रत्येक वयोगटात मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढताना दिसते.
घरगुती वायुप्रदूषण आणि ओझोन प्रदूषणाचाही मोठा वाटा
ओझोन प्रदूषणाचाही मृत्यूंमध्ये काही प्रमाणात वाटा असला तरी पीएम २.५ आणि घरगुती प्रदूषण हे प्रमुख कारण असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. विशेषतः शहरी भागातील वाढते वाहनप्रदूषण, औद्योगिकीकरण आणि ग्रामीण भागात अजूनही सुरू असलेला पारंपरिक इंधनांचा वापर ही चिंतेची बाब आहे.
उपाय काय?
तज्ज्ञांच्या मते, स्वच्छ इंधनाचा वापर, प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, हरित क्षेत्रांची वाढ आणि हवेच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची ही संख्या आगामी काळात आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच आरोग्य रक्षणासाठीही वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज बनली आहे.