World Environment Day : वसुंधरेचे रक्षण हीच काळाची गरज! 'या' खास दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि यंदाची खास संकल्पना ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
World Environment Day 2026 Theme : आज संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या मागे धावत असताना आपण आपल्या अस्तित्वाचा मुख्य आधार असलेल्या निसर्गाला कुठेतरी विसरत चाललो आहोत. याच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, झाडे लावण्याचा आणि प्रदूषण कमी करण्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा केवळ एक दिवस नसून आपल्या पृथ्वीला, नद्यांना, जंगलांना आणि शुद्ध हवेला वाचवण्यासाठी मानवाने घेतलेली एक प्रतिज्ञा आहे. यंदाच्या म्हणजेच २०२६ च्या पर्यावरण दिनाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण जागतिक तापमानवाढीचे (Global Warming) संकट आता उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
या आंतरराष्ट्रीय मोहिमेची पाळेमुळे ५४ वर्षे जुनी आहेत. सन १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) मानवी पर्यावरण या विषयावर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे एक विशेष परिषद आयोजित केली होती. या परिषदेत जगातील अनेक देशांनी एकत्र येत ढासळत्या पर्यावरणावर चिंता व्यक्त केली. याच परिषदेदरम्यान ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षांनी, म्हणजेच १९७४ मध्ये “केवळ एकच पृथ्वी” (Only One Earth) या घोषणेसह पहिला जागतिक पर्यावरण दिन अधिकृतपणे साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी जगभरातील १५० हून अधिक देश या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
दरवर्षी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) या दिनासाठी एक विशिष्ट थीम किंवा संकल्पना निश्चित करतो. यंदाच्या वर्षाची अधिकृत थीम “Inspired by Nature. For Climate. For Our Future.” (निसर्गापासून प्रेरित: हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी) ही आहे. या थीमच्या माध्यमातून संपूर्ण जगाला हा संदेश दिला जात आहे की, हवामान बदलाच्या (Climate Change) संकटाशी लढण्यासाठी निसर्गाकडेच सर्व उत्तरे आहेत. जर आपण जंगले वाचवली, सौर ऊर्जेचा वापर वाढवला आणि कार्बनचे उत्सर्जन कमी केले, तरच आपले आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहू शकते. या वर्षी अझरबैजान (Azerbaijan) हा देश या जागतिक सोहळ्याचे यजमानपद भूषवत आहे.
More than a decade after the Paris Agreement, greenhouse gas emissions continue to rise, accelerating climate change. Humanity still has time to act #NowForClimate and curb these emissions. Ahead of #WorldEnvironmentDay, here’s how you can take action https://t.co/uLHCWFXQ1V pic.twitter.com/XWAQQZzKnc — UN Environment Programme (@UNEP) June 3, 2026
credit – social media and Twitter
आज मानवी प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जंगलतोड (Deforestation) होत आहे. सिमेंटची जंगले उभी राहिल्यामुळे वन्य जीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत, ज्यामुळे जैवविविधतेचा (Biodiversity) झपाट्याने ऱ्हास होत आहे. याशिवाय, हवेचे आणि पाण्याचे वाढते प्रदूषण, ओला व सुका कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि समुद्रात साचणारा लाखो टन प्लास्टिक कचरा ही आजच्या काळातील सर्वात गंभीर पर्यावरणीय आव्हाने बनली आहेत. उन्हाळ्यात वाढणारा असह्य उकाडा आणि अवकाळी पाऊस हे सर्व निसर्गाचा समतोल बिघडल्याचेच संकेत आहेत. म्हणूनच, या समस्यांवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’
पर्यावरण दिनानिमित्त केवळ सरकारी पातळीवरच नव्हे, तर स्थानिक पातळीवरही मोठे प्रयत्न केले जातात. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि सामाजिक संस्थांद्वारे (NGOs) या दिवशी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जातात. जनजागृती रॅली, प्लास्टिक हटाव मोहीम, स्वच्छता अभियान आणि शाळांमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये लहानपणापासूनच निसर्गाप्रती प्रेम निर्माण केले जाते. “एक मूल, एक झाड” यासारख्या संकल्पना राबवून समाजातील प्रत्येक घटकाला या हरित चळवळीत सामील करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.






