Innocent Children Day: 'खेळण्यांऐवजी हातात बंदूक' लेबनॉन युद्धाच्या 'त्या' भयानक घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांनी घेतला होता मोठा निर्णय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Innocent Children Day 4 June History : आज जग विज्ञानाच्या आणि प्रगतीच्या मोठ्या गप्पा मारत आहे, परंतु दुसरीकडे जगाच्या पाठीवर कुठेतरी सुरू असलेल्या युद्धांमध्ये आजही निष्पाप चिमुरड्यांचे बालपण उद्ध्वस्त होत आहे. कुठे बॉम्बस्फोटात आई-वडील गमावलेली अनाथ मुले, तर कुठे हातात खेळण्यांऐवजी बळजबरीने बंदूक थामवलेले बालसैनिक; हे भीषण चित्र बदलण्यासाठी आणि अशा निष्पाप मुलांच्या हक्कांसाठी दरवर्षी ४ जून रोजी ‘इंटरनॅशनल डे ऑफ इनोसंट चिल्ड्रन व्हिक्टिम्स ऑफ अग्रेशन’ (International Day of Innocent Children Victims of Aggression) म्हणजेच ‘हिंसाचाराचे बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ पाळला जातो. हा दिवस केवळ एक औपचारिकता नसून, जगभरातील क्रूरतेच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांच्या किंकाळ्यांवर आणि त्यांच्या सुरक्षिततेवर प्रकाश टाकणारा एक गंभीर वैश्विक संदेश आहे.
या दिवसाची सुरुवात एका अत्यंत वेदनादायी ऐतिहासिक घटनेतून झाली आहे. १९८२ मध्ये लेबनॉन युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या इस्रायली लष्करी आक्रमणात शेकडो निष्पाप पॅलेस्टिनी आणि लेबनीज लहान मुले मारली गेली, तर हजारो मुले आयुष्यभरासाठी अपंग आणि मानसिकदृष्ट्या खचली गेली. लहान मुलांची ही भयानक दुरावस्था पाहून संपूर्ण जग हादरले होते. या घटनेचे गंभीर पडसाद उमटल्यानंतर, १९ ऑगस्ट १९८२ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष आपत्कालीन अधिवेशनात एक ठराव संमत करण्यात आला. लेबनॉन आणि जगातील इतर संघर्षांमध्ये बळी पडलेल्या निष्पाप बालकांच्या स्मरणात दरवर्षी ४ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Israel War: इराण युद्धसज्ज! ढिगाऱ्याखालून बाहेर काढला 1000 क्षेपणास्त्रांचा महाकाय खजिना; एक बुलडोझर अन् महासत्तेला धक्का
आजही गाझा, युक्रेन, सीरिया किंवा आफ्रिकन देशांमधील युद्धांवर नजर टाकल्यास समजते की, कोणत्याही संघर्षात सर्वात मोठी किंमत ही लहान मुलांना मोजावी लागते. युद्ध काळात अनेक मुले अनाथ होतात, तर काहींना मानवी तस्करी (Human Trafficking) आणि लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. अत्यंत क्रूर बाब म्हणजे, काही दहशतवादी आणि बंडखोर संघटना लहान मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांच्या हातात थेट शस्त्रे देतात आणि त्यांना ‘बालसैनिक’ (Child Soldiers) म्हणून युद्धाच्या खाईत ढकलतात. हा दिवस अशा सर्व शोषित, पीडित आणि हतबल मुलांच्या वेदनांना जगासमोर आणण्याचे काम करतो, ज्यांचा स्वतःचा कोणताही दोष नसताना ते नरकयातना भोगत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil Prices: पेट्रोल होणार आणखी महाग! इस्रायलच्या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ; लेबनॉनमध्ये युद्ध
मुलांना सुरक्षित, भयमुक्त आणि सक्षम भविष्य मिळावे यासाठी संयुक्त राष्ट्र (UN), युनिसेफ (UNICEF) आणि जगातील अनेक मानवाधिकार संस्था या दिवशी विशेष जनजागृती मोहिमा राबवतात. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, युद्धाच्या काळातही लहान मुलांच्या शाळा, रुग्णालये आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांना लक्ष्य न करण्याचे कायदे आहेत, परंतु अनेकदा या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. हा दिवस जगातील महासत्तांना आणि शासकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतो. जोपर्यंत जगातील प्रत्येक मुलाला शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही.
आपण एका सुजाण नागरिक म्हणून या दिवसाची भावना स्वीकारली पाहिजे. आपल्या आजूबाजूला देखील बालमजुरी, घरगुती हिंसाचार किंवा शोषणाचा बळी ठरणाऱ्या लहान मुलांच्या संरक्षणासाठी आपण नेहमी पुढे आले पाहिजे. कारण आजची लहान मुले हेच उद्याचे भविष्य आहेत आणि त्यांचे बालपण सुरक्षित ठेवणे ही संपूर्ण मानवतेची सामूहिक जबाबदारी आहे.






