वसंत केवळ ऋतू नाही तर उन्हाची तीव्रता आणि पावसाचे प्रमाण मोजण्याचे योग्य माप आहे (फोटो - सोशल मीडिया)
सुनयना सोनवणे : पुणे : सध्या वसंत ऋतू सुरू असून हिवाळा आणि उन्हाळा यांच्या संक्रमणातील हा काळ निसर्गातील सूक्ष्म बदलांचा वेध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आधुनिक उपग्रह, रडार आणि संगणकीय मॉडेल्समुळे हवामानाचा अंदाज आज अधिक अचूक होत असला, तरी वसंत ऋतूतील निसर्ग निरीक्षणावर आधारित पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व अजूनही कायम आहे. वसंत हा केवळ ऋतू नसून, येणाऱ्या हवामानाचा ‘आरसा’ मानला जातो. या काळातील निसर्गातील बदल पुढील उन्हाळा आणि पावसाळ्याचे संकेत देतात, अशी पूर्वापार धारणा आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकरी आणि जाणकार मंडळी वसंतातील तापमानातील चढ-उतार, वाऱ्याची दिशा आणि आकाशातील बदल यावरून हवामानाचा अंदाज बांधत असत. सकाळचा गारवा आणि दुपारची वाढती उष्णता यामधील संतुलन पाहून उन्हाळ्याची तीव्रता ठरवली जाई. वसंतात उष्णता लवकर वाढल्यास कडक उन्हाळ्याचे संकेत मानले जात, तर गारवा टिकून राहिल्यास उन्हाळा तुलनेने सौम्य राहील, असे भाकीत केले जाई.
तज्ञांच्या मते, वसंत ऋतू हा केवळ तापमानातील बदलांचा काळ नसून, निसर्गातील विविध घटकांच्या वर्तनातूनही हवामानाचे संकेत देणारा असतो. सूर्यास्तावेळी आकाश लालसर दिसल्यास पावसाची शक्यता व्यक्त केली जाई; तर चंद्राभोवती वलय दिसल्यास काही दिवसांत पावसाचे आगमन होईल, असा समज होता. ताऱ्यांची स्पष्टता आणि ढगांची हालचाल यावरूनही पुढील हवामानाचा वेध घेतला जाई.
हे देखील वाचा : शहरात जाण्यासाठी पैसै चोरणारा भिवा ते अर्थतज्ज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर; महामानवाच्या संघर्षमय गाथा
सजीवांच्या हालचालींमधूनही वसंत ऋतूत हवामानाचे संकेत स्पष्ट दिसतात. मुंग्या अंडी वर नेत असल्यास पावसाची चाहूल, पक्षी खाली उडू लागल्यास हवेत वाढलेला ओलावा, तर बेडकांच्या आवाजात वाढ होणे हे पावसाच्या आगमनाचे लक्षण मानले जात असे. जनावरांची अस्वस्थता ही वादळ किंवा अचानक बदलणाऱ्या हवामानाची पूर्वसूचना समजली जाई.
तज्ञांच्या मते, वनस्पतींच्या निरीक्षणातही वसंताचे विशेष स्थान आहे. आंब्याचा बहर, कडुलिंबाचा फुलोरा आणि गव्हाची स्थिती यावरून पावसाळ्याचा अंदाज व्यक्त केला जाई. आंब्याचा बहर चांगला असल्यास संतुलित पावसाळ्याची अपेक्षा, तर फुलगळ झाल्यास हवामान अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जाई. गवताची वाढ आणि मातीतील ओलावा यावरूनही पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जाई. त्यामुळे वसंतावर आधारित अंदाज हे केवळ हवामानापुरते मर्यादित नसून कृषी व्यवस्थापनाशी जोडलेले होते. वसंत ऋतू हा पिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि निसर्गातील बदलांचा सर्वात संवेदनशील टप्पा असतो.
हे देखील वाचा : ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते; ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
हवामान अभ्यासक प्रा. डॉ. अनिल राऊत म्हणाले की, ‘पारंपरिक हवामान अंदाज पद्धती या दीर्घकालीन निरीक्षणांवर आधारित होत्या. आजच्या वैज्ञानिक पद्धतींमध्ये डेटा आणि मॉडेल्सचा वापर होतो. मात्र ग्रामीण भागातील लोकांनी केलेली निसर्गाची अचूक नोंद ही त्या काळातील ‘डेटा संकलन’च होती. अनेकदा या अंदाजांमध्ये स्थानिक पातळीवर चांगली अचूकता दिसून येते.’
वसंत ऋतूबाबत पर्यावरण अभ्यासक शुभदा पवार म्हणाल्या की, ‘निसर्गातील सजीवांचे वर्तन हे सूक्ष्म बदलांची जाणीव करून देते. पक्ष्यांचे उडण्याचे स्वरूप, कीटकांची हालचाल किंवा वनस्पतींची प्रतिक्रिया ही हवामानातील बदलांची नैसर्गिक ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ होती. आजही या संकेतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’
वसंत ऋतू : हवामानशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोन
हवामानशास्त्रीय वसंत ऋतू दरवर्षी १ मार्च ते ३१ मे या कालावधीत निश्चित असतो. मार्च, एप्रिल आणि मे हे महिने या ऋतूचे मानले जातात. तापमानाच्या वार्षिक चक्रावर आधारित असल्यामुळे या तारखा स्थिर राहतात आणि हवामानाची आकडेवारी संकलित करणे सुलभ होते. याउलट, खगोलशास्त्रीय वसंत ऋतू पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या स्थितीवर आधारित असतो. वसंत संपात (इक्विनॉक्स) हा त्याचा प्रारंभ मानला जातो, जो यावर्षी १९ मार्च रोजी पासून सुरू झाला. खगोलशास्त्रीय ऋतूंचा कालावधी साधारण ८९ ते ९३ दिवसांचा असतो आणि तो दरवर्षी बदलतो.






