फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना हा 31 जुलैपासुन सुरु होणार आहे. भारताच्या संघाने चौथा सामना ड्राॅ केला, यामध्ये भारताच्या फलंदाजांनी धुव्वाधार फलंदाजी केली. आता शेवटचा सामना भारताच्या संघाने जिंकला तर ही मालिका बरोबरीत संपेल. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. यावर आता भारताचे मुख्य कोच गौतम गंभीर यांनी या संदर्भात सविस्तर उत्तर दिले आहे.
इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह फक्त ३ सामने खेळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. चौथ्या कसोटीच्या समाप्तीनंतर जसप्रीतने मालिकेत ३ सामने खेळले आहेत. म्हणूनच ओव्हल येथे होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी जसप्रीत आपला निर्णय बदलेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मँचेस्टर कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला जसप्रीत बुमराह पुढील सामना खेळण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आले. गंभीर म्हणाला, ‘याबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही आणि जसप्रीत बुमराह शेवटचा कसोटी सामना खेळेल की नाही हे निश्चित झालेले नाही. जो कोणी खेळेल तो या देशासाठी आपले काम करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल.’
पत्रकार परिषदेदरम्यान, गौतम गंभीरला भारतीय गोलंदाजांच्या दुखापतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. खरंतर, चौथ्या कसोटीपूर्वी सराव करताना अर्शदीपच्या बोटावर जखम झाली होती. याशिवाय, आकाश दीपलाही दुखापत झाली होती आणि त्याला मँचेस्टर कसोटीतून बाहेर पडावे लागले. गंभीरने अपडेट देताना सांगितले की, ‘सर्व वेगवान गोलंदाज तंदुरुस्त आहेत आणि कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.’
अंशुल कंबोजने चौथ्या सामन्यात कसोटी पदार्पण केले आणि तो फक्त एकच बळी घेण्यात यशस्वी झाला. गौतम गंभीरने माहिती दिली आहे की इतर वेगवान गोलंदाज तंदुरुस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत आकाश दीप त्याच्या जागी संघात येऊ शकतो. जर जसप्रीत खेळला नाही तर त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. भारताच्या संघामध्ये दुखापतीचे प्रमाण देखील वाढले आहे, त्यामुळे नितिश कुमार रेड्डी हा देखील मालिकेबाहेर झाला आहे.
आता ऋषभ पंत देखील मालिकेधुन बाहेर झाला आहे, त्याच्या जागेवर आता नारायण जगदीसन याला संघामध्ये स्थान मिळाले आहे, त्याला शेवटच्या सामन्यामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल.