युवा भारतीय संघाची धमाकेदार कामगिरी (Photo Credit- X)
IND U19 vs AUS U19 ODI Series 2025: भारताच्या युवा क्रिकेट संघाने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलिया संघाला अक्षरशः धूळ चारली आहे. युवा टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ३-० ने सूपडा साफ केला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने १६७ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह, युवा टीम इंडियाने आगामी कसोटी मालिकेपूर्वी आपले मनोबल उंचावले आहे.
या सामन्यात भारताच्या युवा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २८० धावा केल्या. सलामीवीर वैभव सूर्यवंशी (२० चेंडूत १६) आणि कर्णधार आयुष म्हात्रे (४ चेंडूत ४) स्वस्तात बाद झाले असले तरी, त्यानंतर युवा फलंदाजांनी डाव सावरला. वेदांत त्रिवेदीने ८६ धावांची (९२ चेंडू) दमदार खेळी केली, तर राहुल कुमारने ६२ धावा (८४ चेंडू) करून त्याला चांगली साथ दिली. अखेरीस, खिलान पटेलने ११ चेंडूत २० धावांची उपयुक्त खेळी केली, ज्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
भारताच्या २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा युवा संघ फक्त २८.३ षटकांत ११३ धावा करून सर्वबाद झाला. त्यांचा एकही फलंदाज ५० चा टप्पा गाठू शकला नाही. भारताकडून खिलान पटेलने ७.३ षटकांत २६ धावा देत ४ बळी घेतले. उद्धव मोहनने ५ षटकांत २६ धावा देत ३ बळी, तर कनिष्क चौहानने ६ षटकांत १८ धावा देत २ बळी मिळवले. या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारताने हा सामना १६७ धावांनी एकतर्फी जिंकला.
या मालिकेत भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
आता या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळले जातील, जे ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबरपासून सुरू होतील.
वैभव सूर्यवंशीने सध्याच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण १२४ धावा केल्या. त्याने पहिल्या सामन्यात ३८, दुसऱ्या सामन्यात ७० आणि तिसऱ्या सामन्यात १६ धावा केल्या. काहीही असो, वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये षटकार मारण्याचा विक्रम केला आहे, हा विक्रम कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी स्वप्नवत ठरला आहे. वैभव सूर्यवंशी हा युवा एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये ४३ षटकार मारले.
यापूर्वी हा विक्रम उन्मुक्त चंदच्या नावावर होता, त्याने २०११-१२ मध्ये २१ सामन्यांमध्ये ३८ षटकार मारले होते. वैभवने उन्मुक्तला पाच षटकारांनी मागे टाकले. वैभव सूर्यवंशी हा फक्त १४ वर्षांचा आहे आणि त्याला अजूनही १९ वर्षांखालील क्रिकेट खेळण्यासाठी वेळ आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे त्याच्या षटकार मारण्याची संख्या वाढू शकते.
उन्मुक्त चंद – २१ सामन्यात ३८ षटकार
यशस्वी जैस्वाल – 27 सामन्यात 30 षटकार
संजू सॅमसन – २० सामन्यात २२ षटकार
अंकुश बैन्स – 20 सामन्यात 19 षटकार