कोलकात्याने रोखला हैदराबादचा 'विजय रथ' (Photo Credit- X)
हैदराबादने दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने 18.2 षटकांत केवळ 3 गडी गमावून विजय साकारला. कोलकात्याकडून अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक 59 धावांची (47 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार) अर्धशतकीय खेळी केली.
KKR make it three consecutive wins — they pulled things back in the first innings and then chased down 166 in Hyderabad! 💜🔥#IPL2026 #SRHvKKR #Sportskeeda pic.twitter.com/XGkJNokpau — Sportskeeda (@Sportskeeda) May 3, 2026
सलामीवीर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (43 धावा) आणि फिन ॲलन (29 धावा) यांनी संघाला 49 धावांची दमदार सुरुवात करून दिली. ॲलन बाद झाल्यानंतर रहाणे आणि रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत हैदराबादला बॅकफुटवर ढकलले. शेवटी उपकर्णधार रिंकू सिंगने 11 चेंडूत नाबाद 22 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा डाव 19 षटकांत 165 धावांवर आटोपला. ट्रॅव्हिस हेडने 28 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी केली, ज्यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सलामीवीर इशान किशनने 42 धावांचे योगदान दिले, मात्र त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. हैदराबादची मधली फळी या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली. हेनरिक क्लासेन (11), स्मरण रविचंद्रन (4) आणि अनिकेत वर्मा (6) यांसारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. हैदराबादने आपले शेवटचे ८ फलंदाज केवळ ६० धावांच्या अंतरात गमावले, ज्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
कोलकात्याच्या गोलंदाजांनी या सामन्यात अचूक टप्पा राखला. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने 3 बळी घेत हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २ बळी घेत उत्तम साथ दिली. वैभव अरोरा, कॅमेरून ग्रीन आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.
या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचे 9 सामन्यांत 7 गुण झाले असून त्यांचे प्लेऑफमधील आव्हान जिवंत आहे. दुसरीकडे, सलग पाच विजय मिळवल्यानंतर हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादचे 10 सामन्यांत 12 गुण असून ते अजूनही गुणतालिकेत सुस्थितीत आहेत.






