ग्रामीण क्रिकेट प्रतिभेला मिळतेय बळ (फोटो- सोशल मिडिया)
मुजावर यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या स्वरा कुंजीर, स्वरा गाडे आणि श्रावणी रावळ यांनी महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच रणवीर पांगारे आणि शौर्य कोंडे यांनी महाराष्ट्राच्या निवड चाचणी शिबिरापर्यंत मजल मारली आहे. श्रवण वाव्हळ, अलंकार पारवे आणि पृथ्वीराज कोंडे यांनी विविध निमंत्रित १४ व १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अकादमीत अनेक होतकरू खेळाडूंना तांत्रिक मार्गदर्शन, नियमित सराव आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून दिले जात असल्याने ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला नवे व्यासपीठ मिळत आहे.
नुकताच २३ जुलै रोजी राजू मुजावर यांचा वाढदिवस खेळाडू आणि पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष मेळाव्यात पालक आणि खेळाडूंना क्रिकेटमधील संधी, शिस्त आणि सातत्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन सीएस इन्फोकॉमचे अनिल जोगळेकर, दिव्यांग क्रिकेट असोसिएशन (पुणे जिल्हा) तसेच शरद सावंत, राहुल पांगारे, राहुल वाव्हळ, गणेश घुले, दत्तात्रय दराडे, गणेश खांदवे, कृष्णा गावरस्कर, संजय कुंजीर, संतोष गुप्ता आणि मुकेश पडवळ यांनी केले.
वारकऱ्यांसाठी अन्नदानाचा उपक्रम
पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीदरम्यान विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. खेळाडूंच्या यशामागे मोलाची भूमिका बजावणाऱ्या मातांचा यावेळी विशेष सन्मानही करण्यात आला.
प्रशिक्षणासाठीच शुल्काचा वापर
ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना क्रिकेटपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी राजू मुजावर विशेष प्रयत्न करतात. अकादमीकडून आकारण्यात येणारे शुल्क केवळ अकादमीच्या विकासासाठी आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणावर खर्च केले जाते. अनेक गरजू खेळाडूंच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी स्वतः स्वीकारली आहे.
दक्षिण कोरियात पुण्याचा डंका! जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारताची ३ सुवर्णांसह २० पदकांची कमाई
सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण
स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला दिशा देण्याचे कार्य राजू मुजावर सातत्याने करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असून, त्यांच्या या कार्यामुळे अनेक ग्रामीण खेळाडूंना नवी उमेद आणि संधी मिळत आहे. त्यांच्या सामाजिक व क्रीडा योगदानाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.






