मिळालेल्या माहितीनुसार, ‘कोहलीने आपल्या दुखापतीबाबत मुंबईतील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्याशी सल्लामसलत केली आहे. शस्त्रक्रियेची गरज नसली तरी पूर्णपणे फिट होण्यासाठी सुमारे सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. या काळात बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहाबसाठी पोहचले, शिवाय बरे होण्यासाठी अंदाजे सहा आठवडे लागतील.’ त्यामुळे १४ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचा सहभाग कठीण मानला जात आहे. इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १४ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये सुरू होत आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएल २०२६ च्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी केली होती. मात्र खेळादरम्यान त्याला पायात त्रास जाणवत असल्याचे दिसून आले होते. सुरुवातीला साधा ताण असल्याचे वाटत असले तरी एमआरआय स्कॅननंतर हॅमस्ट्रिंग टेंडन फाटल्याचे स्पष्ट झाले.
विराट कोहली संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी युवा खेळाडूंवर येणार आहे. कोहलीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलदरम्यान रियान पराग जखमी झाल्यानंतर गायकवाडचा इंडिया ‘अ’ संघात समावेश करण्यात आला होता आणि निवड समितीने त्याला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेत कोणाला संघात स्थान मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्माचीही फिटनेस टेस्ट होणार आहे. तो टेस्टसाठी ८ जून रोजी बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजर राहण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी रोहितचा संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याचा सहभाग पूर्णपणे फिटनेस टेस्टच्या निकालावर अवलंबून असेल. आयपीएल २०२६ दरम्यान रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सकडून अनेक सामने खेळता आले नव्हते.






