वेळीच सावध व्हा! फोनमधील जुने अॅप्स ठरू शकतात धोकादायक... यूजर्सच्या सुरक्षेसाठी Google घेऊन येणार नवं फीचर
एखादे अॅप जुने आहे याचा अर्थ ते वर्षानुवर्षे वापरात आहे, असे नाही. आपण गेल्या अनेक वर्षांपासून युट्यूब, फेसबूक आणि व्हॉट्सअॅप सारख्या अॅप्सचा वापर करत आहोत. पण वेळेनुसार हे अॅप्स अपडेट केले जातात, त्यामुळे हे अॅप्स वापरताना फारसा धोका जाणवत नाही. पण जेव्हा एखादा डेवलपर्स अॅपसाठी अपडेट जारी करणं थांबवतो किंवा बंद करतो किंवा गूगल हे अॅप प्ले स्टोअरवरून हटवते, त्यावेळी मोठा धोका निर्माण होतो.
कारण या अॅपसाठी जारी केले जाणारे अपडेट थांबवले जातात आणि हे अॅप्स फोनच्या सिस्टिमसोबत अपग्रेड केले जात नाही, यामुळे अशा अॅप्सना हॅक करणं अत्यंत सोपं आहे. डेवलपर्स जेव्हा अॅपसाठी अपडेट जारी करणं थांबवतो, त्यानंतर या अॅप्सची जबाबदारी घेणारा किंवा यासाठी अपग्रेड जारी करणारा कोणताही व्यक्ती नसतो आणि यामुळे हॅकर याचा फायदा घेऊन असे अॅप्स हॅक करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या गूगलचे प्ले प्रोटेक्ट सिस्टिम अॅप्स स्कॅन करून त्याची सुरक्षा तपासते. ही सिस्टिम डिव्हाईस स्कॅन करून धोकादायक अॅप्स ब्लॉक करते. जर एखादा अॅप तुमचे क्रेडेंशियल चोरी करताना किंवा परवानगीशिवाय इतर डेटा किंवा फाईल्स अॅक्सेस करताना आढळला, तर ही सिस्टिम यूजरला त्वरित नोटिफिकेशन पाठवते. या सिस्टिमच्या मदतीने धोकादायक अॅप्स डिटेक्ट केले जाऊ शकतात. मात्र ही सिस्टिम डिलिस्टेड किंवा डेवलपर्सकडून अपग्रेड न होणारे अॅप्स शोधू शकत नाही. आता गूगल हीच पोकळी भरून काढण्यासाठी काम करत आहे. यासाठी नवीन अपडेट जारी करण्याची देखील तयारी केली जात आहे.
आता गूगल यूजर्सना अशा अॅप्सबाबत नोटिफाय करणार आहे, जे प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत. यासाठी आता नवीन फीचरची चाचणी केली जात आहे. हे फीचर रोलआऊट करण्यात आल्यानंतर फोनमध्ये इंस्टॉल्ड असणारे कोणतेही अॅप जर प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले तर गूगल यूजर्सना याबाबत नोटिफिकेशनद्वारे माहिती देणार आहे. या माहितीच्या आधारावर यूजर निर्णय घेऊ शकणार आहेत की, त्यांना संबंधित अॅप फोनमध्ये ठेवायचा आहे की डिलीट करायचा आहे.






