(फोटो सौजन्य – Pinterest)
मुघल शासक औरंगजेबला मंदिरांचा नाश करणारा म्हणून ओळखले जाते, त्याने आपल्या शासनकाळात अनेक हिंदू मंदिरं उध्वस्त केली. मात्र आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका मंदिराविषयी माहिती सांगत आहोत ज्याचे निर्माण चक्क औरंगजेबाने केले होते. हे मंदिर चित्रकूटमध्ये वसले आहे. चित्रकूटचे बालाजी मंदिर एक वेगळी कथा सांगते. असे म्हणतात की हे मंदिर 1683 ते 1686 च्या दरम्यान औरंगजेबाने स्वतः बांधले होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मुघल शासकाने 330 बिघा जमीन आणि आठ गावांचा महसूल करमुक्त करून या मंदिराच्या हवाली केला होता. इतकेच नाही तर उर्दू आणि फारसी भाषेत लिहिलेल्या ग्रंथांमध्ये ठाकूरजींच्या आनंदासाठी तिजोरीतून दररोज एक चांदीचे नाणे दान केले जाईल असा उल्लेख आहे.
काय सांगते कथा?
चित्रकूट येथील रामघाट येथे बालाजी मंदिराजवळ भगवान शंकराचे प्राचीन शिवलिंग आहे. मंदिराचे पुजारी सांगतात की, औरंगजेब आपल्या सैन्यासह हे मंदिर नष्ट करण्याच्या उद्देशाने आला होता. सैनिकांनी मंदिराच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अयशस्वी झाले. असे म्हणतात की, या काळात मुघल सैन्यात भयंकर महामारी पसरली होती. सैनिक गंभीर अतिसार आणि रोगांनी ग्रस्त होते. यानंतरही औरंगजेबाने पराभव स्वीकारला नाही. बालक दास यांच्या हातात असलेली ठाकूरजींची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची व त्यांच्या सैन्याची परिस्थिती बिकट झाली. पराभव स्वीकारून औरंगजेबाने स्थानिक लोकांना याचे कारण विचारले. लोकांनी त्यांना संत बालकदास यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.
चमत्कार पाहून औरंगजेबाचे उडाले होश
त्यांनतर औरंगजेब संत बालकदास यांच्याकडे गेला आणि तेथे जाऊन त्याने आपली समस्या सांगितली. संताने आगपेटीतून भभूती बाहेर काढली आणि सैनिकांवर शिंपडण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे करताच सर्व सैनिक निरोगी झाले. हा चमत्कार पाहून स्वतः औरंगजेब थक्क झाला आणि याने प्रभावित होऊन त्याने मंदिर पाडण्याचा त्याचा विचार सोडून दिला. यानंतर त्याने मंदिराच्या पुनर्बांधणीचा आदेश दिला. तसेच मंदिराच्या देखभालीसाठी 330 बिघे जमीन दान केली होती, जी आजही बालाजी मंदिराच्या नावावर नोंद आहे. आता दूरदूरवरून भाविक या मंदिरात दर्शनासाठी इथे येत असतात.