व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, एका तरुणाने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून डान्स फ्लोअरवर एन्ट्री घेतली आहे. सुरुवातीला तो आपल्याच धुंदीत नाचताना दिसतो; मात्र जेव्हा उपस्थितांची नजर त्याच्या डोक्यावर जाते, तेव्हा सगळेच थक्क होतात. सहसा लोक डान्स करताना डोक्यावर टोपी किंवा फॅशनेबल कॅप घालतात, पण या पठ्ठ्याने चक्क जेवणाची ‘थाळी’ डोक्यावर ठेवून तिलाच आपली फॅशनेबल टोपी बनवले आहे.
यानंतर डीजेवर गाणे सुरू होताच या तरुणाने असे काही डान्स मूव्ह्स दाखवले की पाहणारे पाहतच राहिले. त्याचे स्टेप्स इतके गुळगुळीत आणि आत्मविश्वासाने भरलेले होते की, लोकांना थेट पॉप संगीताचा राजा ‘मायकेल जॅक्सन’ (Michael Jackson) याची आठवण झाली. विशेषतः त्याचे स्लो-मोशन मूव्ह्स आणि शरीरावरील अप्रतिम नियंत्रण पाहून एखादा प्रोफेशनल डान्सरच स्टेजवर उतरला आहे की काय, असा भास होतो.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) @vivek_dancer_str नावाच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अपलोड होताच या व्हिडिओने इंटरनेटवर अक्षरशः आग लावली असून आतापर्यंत ४ कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर १० लाखांहून अधिक युझर्सनी याला पसंत केले आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर आणि कौतुकास्पद कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी या मुलाला ‘देशी मायकेल जॅक्सन’ ही पदवी दिली आहे. एका युझरने कमेंट करताना लिहिले की, “जर मायकेल जॅक्सनचा जन्म भारतात एखाद्या गावात झाला असता, तर कदाचित त्याने असाच डान्स केला असता.” तर दुसऱ्या एका युझरने उपरोधाने लिहिले, “भावाने तर घरातील ताट-भांड्यालाच आपले डान्सचे हत्यार बनवून टाकले, नादच खुळा!” एकंदरीत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे.






