'शेख हसीनाला लवकर शिक्षा व्हावी' , पहिले भारताला पत्र लिहिले अन्...; आता युनूस सरकारचा नवा डाव(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात आणि पतनानंतर हिंदूंवरील अत्याचार वाढला होता. तसेच याच पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात आले. ताज्या घडामोडीनुसार, बांगलादेशची अंतरिम सरकार भारताकडे शेख हसीनाचा प्रत्यर्पण करण्याची मागणी केली आहे. यासाठी भारताला त्यांनी पत्र देखील लिहिले आहे. तसेच शेख हसीना यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी बांगलादेश प्रयत्न करत आहे.
काय आहेत शेख हसीनांवर आरोप?
बांगलादेश इंटरनॅशनल क्राइम ट्रायब्यूनलचे (ICT) मुख्य अभियोजक मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी शेख हसीना यांच्यावर “मानवतेविरुद्ध गुन्हा” केल्याचा आरोप केला आहे. इस्लाम यांनी म्हटले आहे की, शेख हसीना यांनी जुलै महिन्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा बळजबरीने अंत घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांची हत्या घडवून आणली होती. त्यांनी म्हटले आहे की, हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लवकरात लवकर खटला चालवला जाईल आणि एका वर्षाच्या आत शिक्षा सुनावली जाईल. तसेच बांगलादेशन शेख हसीना वर लोकांना जबरदस्तीने गायब केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
भारताला पत्र पाठवले
शेख हसीना यांच्यावरील आरोपानंतर भारतावर देखील बांगलादेशने लोकांना गायब करण्यात शेख हसीना यांची मदत केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बांगलादेश युनुस सरकारने भारताला पत्र पाठवून शेख हसीना यांच्या त्वरित प्रत्यार्पणची मागणी केली. युनुस सरकारने म्हटले आहे की, शेख हसीना विद्यार्थ्यांच्या हत्यांमध्ये थेट सहभागी होत्या आणि त्या मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या दोषी आहेत. सरकारने या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी भारताने हसीनांना परत पाठवावे, असे आवाहन केले आहे. त्यांनी भारताला एक रिमांडर लेटर देखील पाठवले होते.
बांगलादेश राजकीय सूड उगवत आहे
शेख हसीना यांचे पुत्र संजीब वाजिद यांनी यावर प्रतिक्रिया देत बांगलादेश अंतरिम सरकारवर राजकीय सूड उगवण्याचा आरोप केला आहे. वाजिद यांच्या म्हणण्यानुसार, अवामी लीगच्या नेत्यांना अडकवून विरोधक सूडबुद्धीने काम करत आहेत आणि न्यायालयांचा गैरवापर केला जात आहे. त्यांनी या हत्यांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येण्याची मागणी केली आहे.
प्रतिशोध की न्याय?
शेख हसीना यांच्याविरोधात केलेले आरोप हे फक्त राजकीय सूड आहेत की त्यामागे खरे पुरावे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अंतरिम सरकारने त्यांच्यावर गंभीर आरोप लावत त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणावर बांगलादेशात राजकीय वातावरण तापलेले असून, भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या, हसीना यांना भारताकडून परत पाठवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा बांगलादेशातील राजकीय स्थैर्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. या प्रकरणाचे पुढील कायदेशीर आणि राजकीय परिणाम पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.