ढाकाच्या 'या' निर्णयाने आणखी बिघडले भारत-बांगलादेश संबंध, काय आहे नेमकं प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेश-भारत संबंध अधिकच चिघळत चालले आहेत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेश पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. यामागचे कारण म्हणजे ढाकाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ढाकाने नवी दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. यापूर्वीही बांगलादेशने भारतीय न्यायाधीशांच्या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. बांगलादेशच्या या निर्णयाने भारतासोबतचे संबंध अधिक तणावात चालले आहेत.
सहभागी न होण्यामागचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार देताना यामागचे कारणही सांगितले आहे, बांगलादेश सरकारने हा निर्णय सरकारी खर्चावर अनावश्यक परदेश दौऱ्यांवर मर्यादा आणण्याच्या धोरणामुळे घेतल्याचे सांगितले आहे. भारताच्या हवामान विभागाच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सहभागी होण्यास नकार दिला. यामुळे दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बांगलादेशने हवामान विभागाचे (BMD)संचालक मोमिनुल इस्लाम यांनी IMD कडून निमंत्रण मिळाल्याची पुष्टी केली. त्यांनी म्हटले की, “भारत हवामान विभागाने 150व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले आहे. आमचे भारताशी चांगले संबंध आहेत आणि हवामान खात्यांदरम्यान सहकार्य सुरू राहील.” मात्र, सरकारी धोरणामुळे या सोहळ्यात सहभागी होणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
IMD च्या सोहळ्यासाठी अनेक देशांना निमंत्रण
भारत हवामान विभागाने बांगलादेशासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव यांसारख्या देशांना निमंत्रित केले आहे. IMD च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, “आम्ही 150 वर्षांपूर्वी IMD च्या स्थापनेच्या वेळी भारताचा भाग असलेल्या सर्व देशांना आमंत्रित केले आहे.” पाकिस्तान या सोहळ्यात सहभागी होण्यास तयार असल्याचे आधीच सांगण्यात आले आहे, मात्र बांगलादेशकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
IMD चा ऐतिहासिक प्रवास
ब्रिटिश राजवटीत 1875 साली IMD ची स्थापना चक्रीवादळे आणि मान्सूनच्या आपत्तीमुळे करण्यात आली. कोलकात्यात सुरुवातीला IMD चे मुख्यालय होते. कालांतराने हे मुख्यालय शिमला, पुणे आणि शेवटी दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात आले. 15 जानेवारी 2025 रोजी IMD आपली 150वी वर्धापन दिन सोहळा साजरा करणार आहे. बांगलादेशच्या या निर्णयामुळे भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही देश हवामान शास्त्राच्या क्षेत्रात सहकार्य करत असले तरी बांगलादेशाचा पाकिस्तानकडे झुकलेला कल चिंतेची बाब ठरत आहे.