ग्रीनलँडसाठी अमेरिका आणि डेन्मार्क का भिडले? ट्रम्प यांचा तो एक हट्ट आणि डेन्मार्कची 'आर-पार'ची लढाई; वाचा काय होतं नेमकं प्रकरण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Trump Greenland Purchase Conflict : जागतिक राजकारणात कधी कोण कोणाचा शत्रू बनेल हे सांगता येत नाही. पण जेव्हा नाटो (NATO) सारख्या बलाढ्य संघटनेचे दोन सदस्य देश एकमेकांविरुद्ध शस्त्र उपसण्याची भाषा करतात, तेव्हा जग हादरून जातं. असाच काहीसा प्रकार सध्या अमेरिका आणि डेन्मार्क यांच्यात पाहायला मिळत आहे. निमित्त आहे जगातील सर्वात मोठे बेट ‘ग्रीनलँड’. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा ग्रीनलँडवर असलेला डोळा आणि डेन्मार्कचा आपल्या सार्वभौमत्वासाठी असलेला बाणा यामुळे हे दोन मित्र युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात ग्रीनलँड हे बेट अमेरिकेला विकत घ्यायचे आहे, असा प्रस्ताव मांडला होता. ट्रम्प यांच्या मते, हे केवळ रिअल इस्टेटचा व्यवहार होता. ग्रीनलँडमधील खनिज संपत्ती आणि त्याचे आर्क्टिकमधील धोरणात्मक स्थान यामुळे अमेरिकेला तिथे आपला प्रभाव वाढवायचा आहे. मात्र, ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अर्ध-स्वायत्त भाग आहे. डेन्मार्कने ट्रम्प यांचा हा प्रस्ताव अत्यंत अपमानास्पद ठरवत फेटाळून लावला होता. इथूनच या संघर्षाची ठिणगी पडली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait : नेतान्याहू यांचा ‘तो’ दावा आणि इराणची कोंडी; होर्मुझ संकटाच्या काळात इस्रायलने जगाला दिली गुड न्यूज
डॅनिश सार्वजनिक प्रसारक ‘डीआर’ (DR) ने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. डॅनिश सरकारला भीती होती की, जर डेन्मार्कने ग्रीनलँड विकण्यास नकार दिला, तर ट्रम्प प्रशासन लष्करी बळाचा वापर करून हे बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल. या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी डेन्मार्कने एक धोकादायक योजना आखली होती. जर अमेरिकन सैन्य ग्रीनलँडमध्ये घुसले, तर डेन्मार्क स्वतःच तिथले मुख्य विमानतळ आणि धावपट्टी बॉम्बने उडवून देणार होता, जेणेकरून अमेरिकेला तिथे आपली विमाने उतरवता येणार नाहीत.
परिस्थिती किती गंभीर होती, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, डेन्मार्कने आपल्या युरोपीय मित्र राष्ट्रांकडून रक्ताच्या साठ्याची मागणी केली होती. ही मागणी सहसा अशा वेळी केली जाते जेव्हा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची किंवा युद्ध होण्याची शक्यता असते. डॅनिश लष्करी सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “आम्ही सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार होतो. नाटोचा सदस्य असूनही आम्हाला आमच्याच मित्राकडून (अमेरिका) धोका वाटत होता.”
ग्रीनलँड हे केवळ बर्फाचं बेट नाही. आर्क्टिक महासागरातील त्याचे स्थान रशिया आणि चीनवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मौल्यवान खनिजे, गॅस आणि तेलाचे साठे आहेत. अमेरिकेचा ‘थुले एअर बेस’ आधीच तिथे आहे, पण ट्रम्प यांना संपूर्ण बेटावर अमेरिकेची सत्ता हवी होती. डेन्मार्कसाठी हे त्यांच्या स्वाभिमानाचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait : संपूर्ण जगावर ‘डिजिटल अटॅकची’ छाया! समुद्रसपाटीपासून 200 फूट खाली इराणचा सापळा; भारताच्या 53% डेटावर संकट
या घटनेमुळे नाटो सदस्य देशांमधील अंतर्गत विश्वासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला रशियाचे संकट असताना, दुसरीकडे अमेरिकेसारखा देश आपल्याच मित्राच्या जमिनीवर डोळा ठेवून बसला असेल, तर ही युरोपीय देशांसाठी चिंतेची बाब आहे. डेन्मार्कने दिलेला हा लढा दाखवून देतो की, छोटे देशही आपल्या सार्वभौमत्वासाठी महासत्तांशी भिडायला तयार आहेत.
Ans: ग्रीनलँडमधील प्रचंड खनिज संपत्ती आणि आर्क्टिक क्षेत्रातील लष्करी व धोरणात्मक वर्चस्व मिळवण्यासाठी ट्रम्प यांना हे बेट हवे आहे.
Ans: अमेरिकन लष्कराने ग्रीनलँडवर कब्जा करू नये आणि त्यांची विमाने तिथे उतरू नयेत, यासाठी डेन्मार्कने हा 'डिस्ट्रक्शन' प्लॅन तयार केला होता.
Ans: नाही, ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक अर्ध-स्वायत्त (Semi-autonomous) भाग आहे, जो अंतर्गत व्यवहारांमध्ये स्वतंत्र असला तरी संरक्षण आणि परराष्ट्र धोरणासाठी डेन्मार्कवर अवलंबून आहे.






