सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाशी सुसंगतपणे जुळवून घेता यावे यासाठी यंदा शाळा सुरू होताच सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सेतू अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून, तो पूर्ण झाल्यानंतर नियमित अध्यापनाला सुरुवात केली जाणार आहे.
राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. यापैकी तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमातील संकल्पना, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती यांची जुन्या अभ्यासक्रमाशी सांगड घालण्यासाठी हा सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम परिषदेच्या संकेतस्थळावर ‘www.maa.ac.in’पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून तो सर्वांसाठी खुला आहे.
‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित केलेल्या ध्येयांची परिपूर्ती करण्याच्या दृष्टीने हा सेतू अभ्यास तयार केला आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रम २०२६ मधील ध्येये, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या हेतूने हा अभ्यास महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे.’’ – डॉ. हेमंत वसेकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)
सेतू अभ्यासक्रमाची रचना
शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी
शिक्षकांना देण्यात आलेल्या जनगणनेच्या कामांमुळे पुढे ढकलावे लागलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, १० जुलैपर्यंत तालुका स्तरापर्यंतचे पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रशिक्षण वेळापत्रकासह सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले.






