'चीन आमच्या विकासासाठी महत्त्वाचा पण भारत...' बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचे धक्कादायक वक्तव्य( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: सध्या भारत आणि बांगलादेशात ताणावपूर्ण संबंध आहेत. बांगलादेश कोणत्या ना कोणत्या विषयावरुन भारतावर वक्तव्य करत आहे. दरम्यान, बांगलादेशचे आर्मी चीफ वकार-उज-जमान यांनी भारत आणि चीनशी असलेल्या संबंधांवर भाष्य करताना एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बांगलादेश आणि भारताच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे.
बांगलादेशचे आर्मी चीफ वकार-उज-जमान यांनी चीनला बांग्लादेशच्या विकासात महत्त्वाचा भागीदार म्हणून संबोधले आहे. याशिवाय, त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, बांगलादेश कधीच भारताच्या हितांविरोधात जाणार नाही. परंतु दोन्ही देशांमधील संबंध परस्पर समानतेवर आधारित असावेत असे त्यांनी म्हटले आहे.
भारतावर बांगलादेशचे अवलंब
वकार-उज-जमान यांनी म्हटले की, “बांगलादेश अनेक बाबतीत भारतावर अवलंबून आहे. भारतालाही बांगलादेशकडून फायदा होतो. भारतातील अनेक नागरिक बांगलादेशमध्ये औपचारिक आणि अनौपचारिकरित्या काम करत आहेत. तसेच, बांगलादेशचे अनेक लोक उपचारासाठी भारतात जातात. बांगलादेश भारताकडून विविध उत्पादने खरेदी करतो.
यामुळे बांगलादेश स्थिर राहणे हे भारतासाठी देखील फायदेशीर आहे.” त्यांनी स्पष्ट केले आहे की परस्पर लाभाचे संबंध तेव्हाच चांगले होऊ शकतात, जेव्हा ते समानतेवर आधारित असतात. भारत बांगलादेशवर वर्चस्व गाजवत नाही किंवा बांगलादेशच्या हितांवर परिणाम करत नाही, हे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
चीन बांगलादेशाच्या विकासाचा भागीदार
तसेच आर्मी चीफ वकार-उज-जमान यांनी चीनसोबतच्या बांगलादेशच्या आर्थिक व लष्करी संबंधांवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, ” सर्वासोबत कोणासोबतही शत्रुत्व नाही” हे बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणाची भूमिका आहे. चीन यामध्ये मोटी भूमिका बजावतो. बांगलादेशमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून यामुळे चीन बांगलादेशसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशी सैन्य आणि चीनी शस्त्रास्त्रे
आर्मी चीफ वकार-उज-जमान यांनी बांगलादेशने चीनच्या शस्त्रास्त्रांचा कसा वापर केला याबद्दलही चर्चा केली. “आमचे एअरफोर्स आणि नेव्ही चीनच्या स्वस्त आणि प्रभावी शस्त्रास्त्रांचा वापर करत आहेत,” असे त्यांनी नमूद केले. या अगोदर, बांगलादेशमधील चीनी राजदूत याओ वेन यांनीही चीन बांगलादेशच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला समर्थन करेल, असे म्हटले होते.
वकार-उज-जमान यांनी हेही नमूद केले की, बांगलादेशला संतुलित दृष्टिकोन ठेवून भारत आणि चीनसारख्या दोन्ही देशांबरोबर संबंध राखावे लागतील. त्यांच्या मते, हे संबंध बांगलादेशच्या हितासाठी पारदर्शक आणि परस्पर समानतेवर आधारित असले पाहिजेत.