Iran internal crackdown : इस्रायलसोबत 12 दिवस चाललेल्या संघर्षानंतर युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर इराणने देशांतर्गत सुरक्षेचा धागा पकडत मोठी मोहिम सुरू केली आहे. इराण सरकारने देशातील संभाव्य देशद्रोही आणि गुप्तहेरांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत सुमारे ७०० नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः ज्यू समुदायातील व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांच्यावर इस्रायलला गोपनीय माहिती पुरवल्याचा संशय आहे.
इस्रायली हल्ल्यांमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इराण सरकारच्या मते, शत्रूंना मिळालेली माहिती घरभेदींमुळेच लीक झाली असावी. त्यामुळे सरकार आता स्वतःच्या देशातील ‘देशद्रोह्यांचा शोध’ घेत आहे, अशी माहिती इराणमधील सरकारी मीडिया आणि मानवी हक्क संघटनांनी दिली आहे.
ज्यू समुदाय विशेष लक्षात
इराणमध्ये राहत असलेल्या ८,००० ते १०,००० ज्यू नागरिकांपैकी अनेक जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, तर काहींना अटकही करण्यात आली आहे. फार्स वृत्तसंस्थेनुसार, अटक केलेल्या अनेकांवर इस्रायलशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, त्यांच्या घरी छापे टाकून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. मानवी हक्क संघटना HRANA च्या मते, पहिल्यांदा ३५ ज्यू व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, आणि अमेरिकेने युद्धबंदी जाहीर केल्याच्या दिवशी हे घडले. यानंतर अटकसत्र सुरूच आहे. ज्या ज्यूंना चौकशीसाठी बोलावले गेले आहे त्यांना परदेशात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क ठेवू नये असा इशारा देण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत-फ्रान्सचा ‘SHAKTI-VIII’ सराव यशस्वीरित्या संपन्न; इलेक्ट्रॉनिक युद्ध, ड्रोन युद्ध आणि सामरिक समन्वय, पाहा VIRAL VIDEO
छाप्यांची भीती आणि रात्रीच्या अटकसत्रांमुळे भयाचं वातावरण
इराणी ज्यू समुदायातील एका व्यक्तीने सांगितले की, छाप्यांची वेळ, पद्धत आणि चौकशीतील दबाव गंभीर मानसिक त्रास देणारे आहेत. इस्रायलच्या चॅनल १२ ला मुलाखत देताना ‘मरियम’ नावाच्या महिलेने सांगितले की, रात्री १.३० वाजता सैनिकांनी भिंत ओलांडून अंगणात प्रवेश केला आणि बंदुकीच्या धाकावर कुटुंबातील १० जणांना पळवून नेले. नंतर महिलांना जामिनावर सोडण्यात आले, मात्र पुरुषांची स्थिती अद्याप स्पष्ट नाही.
धार्मिक नेत्यांवरही संशय
तेहरान आणि शिराझ येथील काही रब्बी आणि ज्यू धार्मिक नेत्यांवरही कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय इस्रायलशी संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आले आहेत. काही जणांना फसवून फाशी देण्यात आल्याचेही मानवी हक्क संघटनांचे म्हणणे आहे.
कुर्द नागरिकांनाही शिक्षा
टाईम्स ऑफ इस्रायल च्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन कुर्द व्यक्तींना इस्रायलशी संगनमताचा दोषी ठरवून फाशी देण्यात आली आहे. यामध्ये इद्रिस अली, आझाद शोजाई, आणि रसूल अहमद रसूल यांचा समावेश आहे. इराणमध्ये न्याय प्रक्रिया त्वरित आणि कठोर पद्धतीने केली जाते, विशेषतः जेव्हा ‘परदेशी गुप्तहेर सेवे’शी संबंध असल्याचा संशय असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘तर भारताने पाकिस्तानचा सर्वनाशच केला असता…’ इंडोनेशियात Indian Navyचे कॅप्टन शिव कुमार यांचा महत्त्वाचा खुलासा
जगभरात टीका, पण इराण निर्धाराने पुढे
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि अन्य संघटनांनी या अटकसत्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली असली तरी इराण सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ही मोहीम राबवत आहे. मानवाधिकार गटांच्या मते, मृत्युदंड देण्याच्या बाबतीत इराण चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. इराण सरकारने सांगितले आहे की, “आपल्या विरोधकांनी इस्रायलला साथ दिली आणि यामुळे आमचे नुकसान झाले. याचे उत्तर कठोर कारवाईतूनच दिले जाईल.” त्यामुळे, युद्धबंदीनंतरही इराणमध्ये अंतर्गत गडबड आणि अस्थिरता कायम असून, देशद्रोहाच्या संशयावरून अटक झालेल्यांची संख्या पुढेही वाढण्याची शक्यता आहे.