फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बेरूत: इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध हवाई हल्ले सुरूच ठेवले आहे. या आक्रमक कारवाईत इस्त्रायल आता दक्षिण लेबनॉनच्या रम्या गावात घुसखोरी करून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे लेबनॉनच्या दक्षिण भागात इस्रायल आणि हिजबुल्लाहच्या लष्करामध्ये भीषण जमीनी आणि हवाई युद्ध सुरू आहे. हिजबुल्लाहने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इस्रायलच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून सध्या त्यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे.
गाझामध्येही हवाई हल्ले सुरूच
याशिवाय, गाझामध्येही इस्रायलने आपल्या हल्ल्यांचा जोर वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने केलेल्या गाझा पट्टीतील हल्ल्यांमध्ये गेल्या 24 तासांत किमान 29 पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांमुळे गाझाच्या जबलिया भागातील नागरिकांवरही संकट ओढावले आहे. या ठिकाणी हजारो लोक अडकलेले आहेत आणि मदत संस्था त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस काय म्हणाले?
या संघर्षात संयुक्त राष्ट्राच्या (UN) तीन कर्मचाऱ्यांना जखमी करण्यात आले आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे दक्षिण लेबनॉनमधील युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स इन लेबनॉन (UNIFIL) तळाला धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून पाश्चात्य देशांनीही याला “गंभीर” म्हटले आहे. UNIFIL फोर्सने या घटनेला “गंभीर” म्हटले असून UN कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे. फ्रान्सनेही इस्रायलच्या राजदूताला बोलावून अशा हल्ल्यांना “अनावश्यक” म्हटले आहे.
UNIFIL दिलेल्या माहितीनुसार इस्रायल आता जमिनीमार्गे बुलडोझरने हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याचे बुलडोझर दक्षिण लेबनॉनमधील त्याच्या आणखी एका चौकीवर हल्ला करत आहेत. इस्त्रायली टँकने थेट त्याच्या मुख्यालयातील टॉवरवर गोळ्या झाडल्या, दोन इंडोनेशियन शांती सैनिक जखमी झाले. एवढेच नाही तर इस्त्रायली सैनिकांनी ज्या बंकरवर शांतता सैनिक आश्रय घेत होते त्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात वाहने आणि दळणवळण यंत्रणांचे नुकसान झाले आहे.
अमेरिकेला UN कर्मचाऱ्यांवर हल्ला न करण्याचे आवाहन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला UN कर्मचाऱ्यांवर हल्ला न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रशियानेही इस्रायलच्या या कारवायांचा निषेध केला असून शांतता सैनिकांविरुद्ध शत्रुत्वपूर्ण कारवाई न करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय समुदायातून इस्रायलच्या कारवायांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, तर गाझा आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे तणाव वाढत आहे.