भारतासाठी धोका! बांगलादेश अन् मालदीवची पाकिस्तानशी हाती मिळवणी; काय आहे नेमकं प्रकरण?(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मले: अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सैयद असीम मुनीर यांनी बांगलादेश आणि मालदीवच्या सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR)ने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत क्षेत्रीय सुरक्षा परिस्थिती आणि संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. या चर्चेत बांगलादेशच्या नौदलप्रमुख एडमिरल मोहम्मद नजमुल हसन आणि मालदीवच्या संरक्षण दलाचे प्रमुख मेजर जनरल इब्राहिम हिल्मी सहभागी झाले होते.
दोन्ही बैठकीनंतर ISPR ने स्वतंत्र प्रेस रिलीज जारी केले, यामध्ये या भेटींचे तपशील देण्यात आले. मात्र, पाकिस्तानची मालदीव आणि बांगलादेशसोबत वाढती मैत्री भारतासाठी धोक्याची मानली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशने भारताला पुन्हा सुनावले: शेख हसीनांबाबत दिला ‘हा’ इशारा
पाकिस्तान आणि मालदीवमधील वाढती भागीदारी
जनरल असीम मुनीर व मेजर जनरल हिल्मी यांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान आणि मालदीव यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशाच्या नेत्यांनी आपले सामान हित जपण्याचा निर्धारावर आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली. विशेष म्हणजे, मेजर जनरल हिल्मी यांनी क्षेत्रीय स्थिरतेसाठी पाकिस्तानच्या योगदानाची प्रशंसा केली.
सध्या भारत आणि मालदीव यांच्यातील तणापूर्ण संबंध असताना, मालीदीवच्या नव्या सरकारने भारतविरोधी धोरण अवलंबले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत मालदीवच्या वाढत्या घनिष्ठतेकडे भारताने गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.
बांगलादेशच्या नौदलप्रमुखांची भूमिका
एकीकडे बांगलादेशचे नौदलप्रमुख एडमिरल हसन यांनी देखील पाकिस्तानच्या क्षेत्रीय स्थैर्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या ‘अमन 2025’ या बहुराष्ट्रीय नौदल सरावाचे स्वागत केले असून ही योजना समुद्री सुरक्षा वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरेल असे म्हटले आहे.
तर बांगलादेशची पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांशी ही अलिकडील दुसरी उच्चस्तरीय भेट होती. या चर्चेत दोन्ही देशांनी सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर भर दिला. तसेच, एडमिरल हसन यांनी पाकिस्तानच्या संयुक्त लष्करी प्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्जा यांची भेट घेऊन समुद्री सहकार्य आणि सामरिक हितांवर चर्चा केली.
हंगरीसोबतही संरक्षण सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न
याशिवाय, पाकिस्तानने युरोपियन देश हंगरीसोबतही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची चर्चा केली. हंगरीचे उपसंरक्षण मंत्री तमस वर्गा आणि जनरल साहिर शमशाद मिर्जा यांच्यात संरक्षण क्षेत्रातील नवीन संधी शोधण्याबाबत बैठक झाली.
भारतासाठी हे घटनाक्रम चिंतेचा विषय ठरू शकतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि मालदीव यांच्यातील वाढते सैन्य सहकार्य आणि चीनचा अप्रत्यक्ष पाठिंबा हा भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान निर्माण करू शकतो, असे मानले जात आहे.