रशियन तुरुंगात युक्रेनच्या पत्रकाराचा अमानुष अंत; व्हिक्टोरिया रोशचिनाच्या मृत्यूची कहाणी ऐकून उडेल थरकाप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कीव: गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असेलेले युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी 8 मे ते 10 मे पर्यंत तीन दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. तथापि एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियाच्या तुरुंगामध्ये युक्रेनच्या एका पत्रकार महिलेचा अमानुष छळ करण्यात आला आहे. याची कथा इतकी भयानक आहे की, वाचून तुमच्याही अंगावर काटा येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने युक्रेनियन महिला पत्रकार व्हिक्टोरिया रोशचिनाला कैद केले होते. रशियाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात रिपोर्टिंग करताना व्हिक्टोरियाचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिला अनेक महिने कैदेत ठेवण्यात आले. तिचा छळ करण्यात आला. त्यानंतर तीची बॉडी एका बॅगमध्ये परत आणण्यात आली. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे मानवी हक्कांबाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने रशियाची क्रूरता समोर आली आहे. पुतिन यांची दुष्टता यातून दिसून येते असे म्हटले जात आहे.
व्हिक्टोरिया 27 वर्षीय धाडसी युक्रेनी महिला पत्रकार होती. तिच्या पत्रकारिता करण्याचा एकच उद्देश होता, तो म्हणजे जगाला सत्य दाखवणे. पण तिचा हा उद्देश तिचा जीवावर बेतला. ती रणांगणात कॅमेरा घेऊन उतरली परंतु मृत्यूने तिला कवटाळले. व्हिक्टोरिया रशियाच्या ताब्यात असलेल्या एका प्रदेशातून रिपोर्टिंग करत होती. या दरम्यान तिथे तिचे अपहरण करण्यात आले. तिच्या घरच्यांनी कुटुंबियांनी, सहकाऱ्यांनी तिची वाट पाहिली. मात्र तिच्या ठावठिकाणाबद्दल कोणताही पत्ता लागला नाही. व्हिक्टोरिया बेपत्ता होण्याला अनेक महिने उलटून गेले होते.
एके दिवशी फेब्रुवारीमध्ये रशियासोबतच्या मृतदेहांच्या अदलाबदलीत एक अज्ञात पुरुष असे लेबल लावलेला मृतदेह मिळाला. मृतहेदाचा चेहरा खराब करुन टाकण्यात आला होता. यामुळे ओळख पटवणे कठीण होते. परंतु डीएनए चाचणीच्या मदतीने ओळख पटवण्यात आली. यातून हा मृतदेह व्हिक्टोरियाचा असल्याचे स्पष्ट झाले.
व्हिक्टोरियाच्य़ा मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर, मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान तिचा मृतहेद पाहून देखील अनेकांच्या अंगावर काटा आला. एका काळ्या बॅगेत तिचा मृतहेदाचे तुकडे तुकडे करु टाकण्यात आले होते. मृतदेहाला ना डोळे होते, ना नाक, मेंदूचा भाग काढून टाकण्यात आला होता. गळाच्या हडांवर फ्रॅक्चर होते. तपासणी दरम्यान तिच्यावर अमानुष छळ झाल्याचे समोर आले. व्हिक्टोरियाची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली होती, याने अनेकांना झटका बसला होता.
दरम्यान युक्रेन आंतरराष्ट्रीय संस्थासोबत मिळून काम करत असून व्हिक्टोरियाच्या मृत्यूमागील सत्य उघड करण्यासाठी लढत आहे. सुरुवातीच्या तपास तिला रशियाच्या टागारोगच्या SIZO-2 या रशियन तुरुंगात ठेवण्यात आले होते अशा माहिती समोर आली आहे. रशियाच्या या तुरुंगाला चेंबर ऑफ डेमन्स म्हणून ओखळले जाते. विक्टोरियाला 2022 मध्ये करेज इन जर्नलिझम पुरस्कार मिळाला होता. तीने केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर त्यामागचे लपलेली गुढं सत्य जगासमोर आणली होती. विक्टोरियाच्या मृत्यूने जगाला हादरवून टाकले आहे. पुन्हा एकदा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्य उघडं करणे इतके महागडं असते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.