पुन्हा वापरले 'ट्रम्प कार्ड'! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा; केली 'ही' मोठी मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या एक आठवड्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. सोमवारी 27 जानेवारी 2025 फोनवरुन बऱ्याच वेळ चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान जागतिक शांततात व सुरेक्षाच्या सहकार्याचे आव्हान करण्यात आले. तसेच दोन्ही देशांतील निपक्ष व्यापारबद्दलही चर्चा करण्यात आली. अध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा पहिला थेट संवाद होता.
मोदींनी ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा
ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर आठवडाभराने झालेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आणि भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. पंतप्रधान मोदी यांनी संवादानंतर, “माझ्या प्रिय मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना आनंद झाला. त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवून परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या जनतेच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षेसाठी आम्ही एकत्रित काम करू.” असे म्हटले.
पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यातील संबंध त्यांच्या पहिल्या कार्यकाळापासून दृढ राहिले आहेत. 2019 मध्ये अमेरिकेतील “हाउडी मोदी” कार्यक्रम असो किंवा 2017 मध्ये व्हाईट हाऊस भेट, या महत्त्वाच्या क्षणांनी दोन्ही देशांतील संबंध मजबूत केले आहेत.
या मुद्द्यावर झाली चर्चा
व्हाईट हाऊसच्या निवेदनात ट्रम्प यांनी अमेरिकन संरक्षण साहित्य खरेदीबाबत अधिक भर दिला आणि व्यापार संबंध न्यायपूर्व करण्यावर भर दिला असल्याचे म्हटले. व्यापार विषयावर ट्रम्प यांनी भारताला “टॅरिफ किंग” संबोधले होते आणि भारताकडून अमेरिकन उत्पादनांवर जास्त शुल्क लावल्याचा मुद्दा मांडला होता. ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याचा इशार आपल्या पहिल्या कार्यकाळातही दिला होता. यामुळे 2019 मध्ये ट्रम्प प्रशासनाने भारताच्या GSP (Generalized System of Preferences) दर्जावर बंदी घातली होती.
इतर मुद्द्यांवरील चर्चा
अलीकडच्या काळात भारताने काही क्षेत्रांमध्ये आयात शुल्क कमी करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच, अमेरिकेकडून अधिक ऊर्जा खरेदी करून व्यापार तूट कमी करण्याचे संकेतही दिले आहेत. संरक्षण क्षेत्रात, भारताने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य खरेदी वाढवली आहे. परंतु, भारताचा रशियासोबतचा संरक्षण संबंध, फ्रान्स आणि इस्रायलकडून साहित्य खरेदी, आणि “मेक इन इंडिया” धोरणांवर अमेरिकेचा आक्षेप आहे.
चीनच्या क्रियाकलापांवर लक्ष केंद्रीत करून भारत आणि अमेरिकेने क्वाड (Quad) संघटनेच्या संदर्भात सहकार्य वाढवण्यावरही भर दिला. भारताने या वर्षी प्रथमच क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. या चर्चेत जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षा वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.