US Tighens 'Visa interview waiver: अमेरिकेने बदलले H1-B व्हिसाचे नियम; अर्जदारांना पाहावी लागणार वाट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेने ‘व्हिसा इंटरव्ह्यू वेव्हर’ अर्थात व्हिसा मुलाखत सवलत योजनेचे नियम कडक केले आहेत, यामुळे H-1B आणि B1/B2 व्हिसा धारकांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या नवीन नियमांनुसार आता ही सुविधा केवळ अशा अर्जदारांना देण्या येणार आहे ज्यांचा व्हिसा मागील 12 महिन्यांत संपुष्टात आला आहे.याचा सर्वात जास्त फटका भारतीयांना बसण्याची शक्यता आहे.
याशिवाय, अमेरिकेला पर्यटन किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या B1/B2 व्हिसा धारकांनाही या नियमांमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोविड काळात दिलेल्या सवलतींमुळे अनेक अर्जदारांना विना-मुलाखत व्हिसा मिळवण्याचा लाभ मिळाला होता. मात्र, आता पुन्हा कडक अटी लागू करण्यात आल्या आहेत.
व्हिसा सेंटरकडून अंमलबजावणी सुरू
सध्या या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरी ‘द नेशनल लॉ रिव्ह्यू’च्या अहवालानुसार व्हिसा अर्ज केंद्रांनी (VAC)हे नवे नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. या अटींमध्ये न बसणाऱ्या अर्जदारांना परत पाठवले जात आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अनेक व्हिसा नियम कडक करण्यात आले होते.
आता कोणती खबरदारी घ्यावी लागेल?
या बदलांमुळे व्हिसा प्रकियेमध्ये मोठा विलंब होण्याची शक्यता आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर, 12 महिन्यांपूर्वी व्हिसा संपलेल्या लोकांना आता मुलाखतीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. यापूर्वी भारतीय नागरिकांना विना-मुलाखत व्हिसा नूतनीकरणासाठी 48 महिन्यांपर्यंतची सवलत दिली जात होती. तसेच ड्रॉपबॉक्स अपॉइंटमेंट घेण्यापूर्वी अर्जदारांनी आपली पात्रता तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. इंटरव्ह्यू स्लॉटसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे प्रक्रिया लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
यामुळे H-1B व्हिसा धारकांनी प्रवासात अडथळे टाळण्यासाठी प्रीमियम प्रोसेसिंगचा पर्याय निवडण्याचा विचार करावा. या बदलांमुळे आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल आणि लवकर तयारी करणे आवश्यक ठरणार आहे.
भारतीयांवर होणार परिणाम
आता नव्या व्हिसा इंटरव्ह्यू वेव्हर नियमांमुळे भारतीय नागरिकांना सर्वाधिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे. विशेषतः व्यावसायिक (B1/B2)आणि रोजगार-आधारित (H1-B) व्हिसासाठी हा बदल अधिक अडचणी निर्माण करु शकतो. भारत हा अनेक काळापासून अमेरिकन व्हिसा अर्जदारांचा एक मोठा स्रोत आहे. या बदलांमुळे भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील संधी साधणे अधिक कठीण होणार आहे. यामुळे अनेक अर्जदारांना योजनेनुसार प्रवास किंवा व्यवसाय सुर करणे अवघड होऊ शकते.