सौदीच्या महत्त्वाच्या तेल रिफायनरीला लक्ष्य
सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चार ड्रोन पाडले
सौदी-हौथी संघर्षामुळे तेल बाजारपेठेवर परिणामाची शक्यता
येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. हौथींचे लष्करी प्रवक्ते याह्या सरी यांनी या हल्ल्यात रिफायनरी परिसरात आग लागल्याचे सांगितले. दुसरीकडे, सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने परिसरात चार ड्रोन पाडल्याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे आखाती देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.
रास तनुरा ही सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल रिफायनरींपैकी एक आहे. या प्रकल्पाची दररोज सुमारे ५ लाख ५० हजार बॅरल तेल शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे. सौदीच्या तेल निर्यातीसाठीही हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
हौथी प्रवक्त्याने थेट हल्ला केल्याचा दावा करत रिफायनरी परिसरात आग लागल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्ष हल्ल्यामुळे किती नुकसान झाले, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
हौथींच्या हल्ल्याच्या दाव्यानंतर सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने रास तनुरा परिसरात चार ड्रोन रोखून नष्ट केल्याचे सांगितले. या कारवाईदरम्यान ड्रोनचे अवशेष खाली पडल्याची माहिती देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, रिफायनरी परिसरातून काळा धूर उठत असल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसून आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
सौदी अरेबिया आणि येमेनमधील हौथी बंडखोरांमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. यापूर्वी रियाधमधील आर्थिक केंद्रातील एका इमारतीवर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यात ११ जण जखमी झाल्याचे समजते आहे .
त्यानंतर सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमधील होदेइदा बंदर आणि इतर ठिकाणांवर कारवाई केली. आता तेल रिफायनरीला लक्ष्य केल्याच्या दाव्यामुळे जागतिक तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. हा संघर्ष आणखी वाढल्यास आखाती प्रदेशातील ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठेवर त्याचे परिणाम होऊ शकतात.