१०० वर्षांचा प्रवास! Bajaj समूहाने साजरे केले शताब्दी वर्ष, असा आहे आतापर्यंतचा प्रवास
१९२६ मध्ये मुंबईत जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेला हा समूह आज दर तीन भारतीय घरांपैकी एका घरापर्यंत पोहोचला असून त्यात १,३०,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. १०० हून अधिक कंपन्या, १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात आणि आरोग्यसेवा (हेल्थकेअर) क्षेत्रात होणारे आगामी पदार्पण यासह बजाज समूहाने ऑटोमोबाईल, आर्थिक सेवा आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड्सपैकी एक निर्माण केला आहे. यामध्ये बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट, बजाज फायनान्स, बजाज हाउसिंग फायनान्स, बजाज इलेक्ट्रिकल्स आणि मुकंद यांसारख्या सूचिबद्ध कंपन्यांचा समावेश आहे.
बजाज समूहाच्या सामाजिक प्रभावाच्या प्रयत्नांनी युवक कौशल्य, रोजगार, बाल आरोग्य, शिक्षण आणि संरक्षण यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच १ कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित शताब्दी सोहळ्याला कुटुंबातील सदस्य, उद्योजक, केंद्रीय आणि राज्य मंत्री, राजकीय नेते आणि नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. या संध्याकाळी बजाज परिवाराचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, व्यापाराकडून उत्पादनाकडे आणि आर्थिक सेवांकडे झालेला प्रवास, आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये बजाज परिवाराचे भाषण, ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज आणि त्यांच्या टीमचा विशेष कार्यक्रम, राजकुमार हिरानी दिग्दर्शित जमनालाल बजाज आणि महात्मा गांधी यांच्यावर आधारित ‘कठनी करनी एकसी’ या लघुपटाचे प्रदर्शन आणि ‘100 इयर्स ऑफ बजाज’ लोगोचे अनावरण यांचा समावेश होता.
या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बजाज ऑटोचे अध्यक्ष, नीरज बजाज म्हणाले, “आमच्या परिवाराच्या वतीने, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो. बजाज आणि भारताची कहाणी कधीच वेगळी राहिलेली नाही. भारताचा स्वावलंबनाचा प्रवास अलीकडे सुरू झालेला नाही, तो शंभर वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. जेव्हा दूरदृष्टी असलेल्या भारतीयांनी असा विश्वास धरला की भारताने स्वतःसाठी निर्माण केले पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आमचे संस्थापक जमनालालजी हे त्यापैकीच एक अग्रदूत होते. ‘वैयक्तिक फायद्यापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य’ या त्यांच्या तत्त्वज्ञानाने आमच्या अनेक पिढ्यांचे निर्णय घडवले आहेत.”
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी ‘जागतिकीकरण’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “आम्ही जे बोलतो आणि जे करतो ते नेहमी सारखेच असले पाहिजे. कदाचित म्हणूनच बजाजचा प्रवास ही केवळ विकासाची कथा न ठरता विश्वासाची कथा बनली. आज बजाज ऑटो ही केवळ भारताचीच नव्हे, तर जगातील पहिल्या तीन दुचाकी कंपन्यांपैकी एक आहे. आमची वाहने आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशियातील १०० हून अधिक देशांत विकली जातात. आजचा भारत केवळ जागतिक अर्थव्यवस्थेत सहभागी होत नाही, तर तो स्पर्धाही करत आहे.”
बजाज इंटिग्रेटेड हेल्थ सिस्टीमचे सीईओ नीरव बजाज यांनी ‘सर्वसमावेशक विकास’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की,”जमनालालजींचा असा विश्वास होता की व्यवसाय हा समाजापेक्षा वेगळा नसतो. व्यवसायाचा उद्देश गरिबांचा फायदा करणे हा असावा. ‘बजाज बियॉन्ड’ हा उपक्रम आमच्या १०० वर्षांच्या याच तत्त्वज्ञानाची पुढची अभिव्यक्ती आहे. येत्या ५ वर्षात २ कोटी तरुण भारतीयांवर प्रभाव टाकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस
बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी ‘भारत आणि पुढील १०० वर्षे’ या विषयावर आपले मांडले. ते म्हणाले की, “माझे वडील राहुल बजाज नेहमी म्हणायचे, माझा ‘आयडिया ऑफ इंडिया’वर आणि येथील तरुण पिढीवर ठाम विश्वास आहे. भारताच्या प्रगतीचा पुढचा अध्याय तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे लिहिला जाईल. बजाजमध्ये आम्ही AI कडे केवळ एक तंत्रज्ञान म्हणून पाहत नाही, तर ती आर्थिक समावेशनासाठी एक शक्तिशाली शक्ती असल्याचे मानतो.”
बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज म्हणाले की,”जमनालालजींचे कार्य सामाजिक समता, महिला आणि मुलांचे शिक्षण, ग्रामीण उत्थान आणि खादीच्या प्रसारापर्यंत विस्तारलेले होते. यश हे केवळ आकड्यांत मोजावे की आपण किती लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि कोणती मूल्ये जपली यावर? पुढील १०० वर्षांत या प्रश्नाचे उत्तरच आमची संस्था परिभाषित करेल.”






