फोटो सौजन्य: iStock
टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने जुलै २०२५ मध्ये आपल्या विक्री कामगिरीची घोषणा करताना समाधान व्यक्त केले आहे. कंपनीने जुलै महिन्यात एकूण ३२,५७५ युनिट्सची विक्री केली असून, त्यामध्ये देशांतर्गत विक्री २९,१५१ युनिट्सवर पोहोचली आहे, तर ३,४१६ युनिट्सचे यशस्वीपणे निर्यातीत रूपांतर करण्यात आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत विक्रीपेक्षा ३ टक्क्यांची वाढ ही कंपनीच्या सशक्त वितरण नेटवर्क आणि उत्पादन गुणवत्ता यांचे प्रमाण मानले जात आहे.
टीकेएमने चालू आर्थिक वर्षाच्या (एप्रिल ते जुलै २०२५) पहिल्या चार महिन्यांत १,१९,६३२ युनिट्सची विक्री नोंदवली असून, ही विक्री मागील वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या १,०४,८६१ युनिट्सच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक आहे. ही वाढ टोयोटाच्या ब्रँड विश्वासार्हतेबरोबरच, नव्या तंत्रज्ञान व सुरक्षिततेच्या बाबतीत झालेल्या सुधारणांमुळे साध्य झाल्याचे बोलले जात आहे. याचप्रमाणे, जानेवारी ते जुलै २०२५ या सात महिन्यांच्या कालावधीत टोयोटाने २,०७,४६० युनिट्सची विक्री केली असून, ही संख्या मागील वर्षीच्या १,८१,९०६ युनिट्सच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक आहे.
नव्या रूपात Volvo XC60 Facelift लाँच, यंदा प्रवाशांच्या सेफ्टीवर जास्त लक्ष
कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल्सपैकी टोयोटा ग्लॅन्झा आणि अर्बन क्रूझर हायरायडरसाठी सादर करण्यात आलेल्या स्पेशल लिमिटेड एडिशन प्रेस्टिज पॅकेजेसना बाजारातून उदंड प्रतिसाद मिळाल्याने या यशात भर पडली आहे. ग्राहकांकडून आलेल्या उत्तम प्रतिसादामुळे हे मॉडेल्स विक्रीच्या आकड्यांमध्ये ठळक वाढ घडवून आणत आहेत. विशेषतः टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला भारत एनसीएपीकडून प्रौढ व्यक्ती व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी दिले गेलेले ५-स्टार सेफ्टी रेटिंग हे कंपनीच्या सेफ्टी-फर्स्ट धोरणाचे उत्तम उदाहरण ठरते. यामुळे सुरक्षितता क्षेत्रातील टोयोटाचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे.
टोयोटा ग्लॅन्झा मॉडेलच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये आता प्रमाणित सहा एअरबॅग्सचा समावेश करण्यात आला असून, यामुळे ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी अधिक व्यापक आणि विश्वसनीय सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची कंपनीची दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
नव्या रंगरूपात Yamaha MT-15 लाँच, आता ग्राहकांना मिळणार अत्याधुनिक फीचर्स
या यशाच्या पार्श्वभूमीवर टोयोटा युज्ड कार बिझनेसचे विक्री व सेवेचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा यांनी म्हटले की, ‘‘आम्हाला जुलै २०२५ मध्ये ३ टक्के वाढीसह ३२,५७५ युनिट्सची विक्री करण्याचा अभिमान वाटतो. एकूणच आमच्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांचा प्रतिसाद सातत्यपूर्ण राहिला आहे. आमच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनामुळे हे शक्य झाले आहे. आगामी काळातही आम्ही आमची उत्पादने उच्च दर्जाच्या सेवेसह आणत राहू. वितरण व्यवस्थेचा विस्तार आणि उत्पादन नवकल्पना यांद्वारे अधिक मूल्यवर्धित सेवा देण्यावर आमचे लक्ष राहील. आमचा विश्वास आहे की यामुळे आगामी महिन्यांमध्ये आमच्या वृद्धीला चालना मिळेल.’’