Strait of Hormuz Crisis: तेल, गॅस पुरवठ्याला युद्धाचा फटका; होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली नागपूरची LPG जहाजं
Strait of Hormuz Crisis: इराणने होमुर्झच्या समुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांना जाण्यापासून रोखल्यामुळे संपूर्ण जगापुढे संकट उभे ठाकले. यामुळे अमेरिकेच्या तेल उत्पादक मित्र देशांमध्ये नवीन अडचणी निर्माण झाल्या. कतारने नैसर्गिक गॅस उत्पादन बंद केले. अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही आठवड्यात तेल उत्पादक देशांना तेल उत्पादन बंद करावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९२ डॉलरच्याही वर पोहचला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
भारत आपल्या आवश्यकतेच्या ८५ टक्के कच्चे तेल विदेशातून आयात करीत असतो. यामधील अर्धे अधिक तेल होमुर्झच्या खाडीद्वारे येतात. याचप्रकारे ९० टक्के नैसर्गिक गॅस सुद्धा याच मार्गाने येतात. हा मार्ग बंद झाला तर देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी गॅसचा सुद्धा सामना करावा लागेल, परिणामी दर वाढेल.
दुसरीकडे, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक सागरी वाहतुकीवर परिणाम होत असून भारतातील कंपन्यांनाही त्याचा फटका बसत आहे. नागपूरस्थित कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडने भाड्याने घेतलेली एलपीजी वाहतूक करणारी दोन जहाजे सध्या होर्मुझ सामुद्रधुनीत अडकून पडली आहेत. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून ही जहाजे त्या परिसरात थांबलेली असून त्यांना पुढील प्रवास करता येत नाही.
यादरम्यान भारत रशियाकडून तेल विकत घेणे सुरू ठेवतील. स्वयंपाकाच्या गॅसमध्ये वाढ झालेली आहे. यामुळे गृहिणींची चिंता वाढलेली आहे. इराणने हाईफा येथील इस्रायलच्या सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. ही रिफायनरी भारत आणि इस्त्रायलच्या सहकार्यातून स्थापन करण्यात आलेली आहे. या हल्ल्यामुळे इस्त्रायलमधील ६० टक्के तेलपुरवठा ठप्प झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर गेल्या ९ दिवसापासून हल्ले करणे सुरू केलेले आहे. हे युद्ध किती दिवस चालतील, हे कोणीही सांगू शकणार नाही.
या युद्धामुळे संपूर्ण जगाला वेठीस धरण्यात आले आहे. युद्ध करणाऱ्या देशांना कोणीही रोखू शकत नाही. संयुक्त राष्ट्र संघ सुद्धा पूर्णपणे निर्षक्रय ठरलेला आहे. अमेरिकेने इराणविरूद्ध कुर्द बंडखोरांनाही युद्धाच्या मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे. पश्चिम आशिया पूर्णपणे अशांत झालेला असून येथे ९० लाख भारतीय काम करीत असतात. इराणमध्ये ९ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. या सर्वांचा जीव धोक्यात आलेला आहे. विमानसेवा ठप्प झाल्यामुळे हजारो पर्यटक तेथेच अडकलेले आहेत.






