फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE 12th Revaluation 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुण पडताळणी (Verification) आणि पुनर्मूल्यांकन (Re-evaluation) प्रक्रिया वेगाने सुरू आहे. विद्यार्थ्यांकडे आता केवळ एक दिवसाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे बोर्डाने मुदतवाढ दिली नाही तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणीची संधी गमवावी लागेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टिममुळे कमी गुण मिळाले आहेत. त्यांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीबीएसईच्या १२ वीच्या गुण पडताळणी आणि पुनर्मुल्याकंनासाठी विद्यार्थ्यांना ६ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://postresult.cbseit.in/pvr/ या संकेतस्थळावर अर्ज करावा.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, ४ जून २०२६ पर्यंत निकालोत्तर तक्रार निवारण प्रक्रियेअंतर्गत एकूण ७०,४३३ यशस्वी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये गुणांच्या पडताळणीसाठी ७,३१४ अर्ज आणि उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी ६३,११९ अर्ज दाखल झाले आहेत.
बोर्डाने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे ज्यानुसार ३ जून २०२६ रोजी या पोर्टलवर सुमारे ३८ लाख पॅकेट्सचा ‘डिनायल-ऑफ-सर्विस’ (DoS) हा सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, तांत्रिक पथकाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे हा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही, ज्यामुळे पोर्टल सुरक्षित आणि सुकरपणे सुरू राहिले.
सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यानंतर २ जून २०२६ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता पोर्टल लाईव्ह करण्यात आले. पोर्टल सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटात तब्बल १५ लाख युझर्सनी या साईटला भेट दिली. तर १ लाखाहून अधिक अनधिकृत लॉगिनचे संशयास्पद प्रयत्न ओळखून ते तात्काळ ब्लॉक करण्यात आले.






