फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE Class 12th Answer Sheet Scanned Copy Deadline : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ बारावीच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मिळवण्यासाठी आज (२५ मे) शेवटची तारीख आहे. यापूर्वी अर्ज करण्याची मुदत २४ मे २०२६ असून काही तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत २५ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली होती. तसेच लवकरच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याच्या तारखाही जाहीर करण्यात येणार आहेत.
सीबीएसीईच्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यंदा ‘सीबीएसई’ने उत्तरपत्रिका ऑनलाईन पद्धतीने (ओएसएम-CBSE On-Screen Marking) तपासल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी या उत्तरपत्रिकांच्या प्रति मागवल्या असता, त्या अस्पष्ट आणि अंधुक दिसत आहेत. त्यामुळे बोर्डाने या उत्तरपत्रिका कश्या तपासल्या यावर प्रश्न उपस्थित होत आहे? अनेकांचे गुण कमी आल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून हा आरोप केला गेला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालोत्तर सेवा पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक व तंत्रज्ञान तज्ञांचे विशेष पथक नियुक्त करण्याचे निर्देश सीबीएसईला दिले आहेत.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शकता, विश्वसनीयता आणि विद्यार्थी स्नेही प्रणाली उभारण्यासाठी तातडीने सुधारात्मक योजना आखण्याची गरज स्पष्ट केली आहे. दरम्यान पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि शुल्काबाबत येणाऱ्या अडचणींवर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा केली.
सीबीएसईच्या पेमेंट गेटवेशी संबंधित असणाऱ्या बँका या अडचणीला सोडवण्यास मदत करतील. जास्त शुल्क कपात झाल्यास त्यांचा परतावा आपोआप मिळावा तसेच तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवण्यात याव्यात, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.






