फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NMMSS Scholarship Scheme: देशात आजही अशी लाखो मुले आहेत, जी अभ्यासात हुशार असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात. विशेषत: ग्रामीण भागात किंवा लहान शहरांमध्ये अनेक कुटुंबे आपल्या मुलांना आठवीनंतर पुढे शिकवू शकत नाहीत. परंतु, अशा विद्यार्थ्यांसाठी आता सरकारची ‘नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम’ (NMMSS) ही उपयोगी ठरत आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सरकार दरवर्षी विद्यार्थ्याना आर्थिक मदत करते, जणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले शिक्षण पुढे सुरू ठेवू शकतील.
केंद्र सरकारच्या (Central Government Scholarship) या योजनेअंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १,००० रुपयांची आर्थिक सहाय्यता विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते, म्हणजेच दरवर्षी १२,००० रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून मिळते. ही मदत इयत्ता ९ वीपासून ते १२ वीपर्यंत दिली जाते. थोडक्यात, एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकतो. पैशांच्या आभावामुळे कोणत्याही मुलाच्या शिक्षणाचा मार्ग रोखला जाऊ नये, हाच सरकारचा यामागील स्पष्ट उद्देश आहे.
जे विद्यार्थी सरकारी शाळा, शासकीय, अनुदानित शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका/जिल्हा परिषद) शाळांमध्ये शिकत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. परंतु, जवाहर नवोद्य विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि खाजगी निवासी किंवा बोर्डिंग शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेस पात्र मानले जात नाही.
सरकारने या योजनेसाठी शैक्षणिक गुणवत्तेशी संबंधित काही अटीही निश्चित केल्या आहेत. विद्यार्थ्याला इयत्ता ७ वीमध्ये किमान ५५% गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यामध्ये ५%ची सवलत देण्यात आली आहे. म्हणजेच कष्टाळू आणि हुशार मुलांना पुढे जाण्याची संधी या स्कॉलरशिपद्वारे मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न ३.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया कशी होते?
NMMSS शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एक परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा राज्य स्तरावर आयोजित केली जाते. यामध्ये अभ्यासाशी संबंधित प्रश्न विचारलले जातात. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करतात, त्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होते.
BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी बंपर भरती; निवड प्रक्रिया आणि पात्रता निकष वाचा एका क्लिकवर..






