फोटो सौजन्य -सोशल मीडिया
नीट यूजी २०२६ (NEET UG 2026) परीक्षेबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ॲक्शन मोडमध्ये आली आहे. २१ जून २०२६ (रविवार) रोजी होणारी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि विद्यार्थी-फ्रेंडली (Student-Friendly) करण्यासाठी एनटीएने अनेक मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट परीक्षेत यंदा सुरक्षेसोबतच उमेदवारांच्या सुविधेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे, जेणेकरून परीक्षा केंद्रात त्यांना कोणताही ताण येणार नाही.
अनेकदा नीट परीक्षार्थी परीक्षा सुरू असताना स्वाक्षरी आणि व्हेरिफिकेशन यांसारख्या सरकारी गोष्टींमध्ये त्यांचा मौल्यवान वेळ वाया जात असल्याची तक्रार करायचे. याशिवाय, फिजिक्स-केमिस्ट्रीच्या मोठ्या कॅल्क्युलेशनसाठी पेपरमध्ये जागा कमी पडणे ही देखील मोठी अडचण होती. उमेदवारांच्या याच समस्या समजून घेत एनटीएने यंदा ‘टेस्ट बुकलेट’च्या रचनेत पूर्ण बदल केला आहे. २१ जून २०२६ रोजी नीट यूजी परीक्षा केंद्रावर कोणते महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील, ते जाणून घेऊया.
नीट परीक्षेसाठी आता १९५ मिनिटे (३ तास १५ मिनिटे) दिली जाणार आहेत. एनटीएने स्पष्ट केले आहे कि, हा वेळ फक्त आणि फक्त परीक्षार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी सुरक्षित असेल. परीक्षा दुपारी २:०० ते संध्याकाळी ५:१५ या वेळेत चालेल. पर्यवेक्षकाची (Invigilator) स्वाक्षरी, बायोमेट्रिक आणि ओएमआर शीट (OMR Sheet) संकलन यांसारख्या सर्व प्रक्रिया याच वेळेत पूर्ण केल्या जातील. दिव्यांग (PwBD) उमेदवारांना ६५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळेल, त्यांचा पेपर संध्याकाळी ६:२० वाजता संपेल.
नीटच्या उमेदवारांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. पेपरमध्ये रफ कामासाठी जागा कमी पडायची, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी बारीक अक्षरात लिहावे लागायचे. एनटीएने ही समस्या कायमची दूर करत टेस्ट बुकलेटमधील रफ वर्कच्या पानांची संख्या २ वरून वाढवून ४ केली आहे. आता कठीण सूत्रे आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल.
देशात सुमारे १०% उमेदवार डाव्या हाताने लिहिणारे आहेत. जुन्या टेस्ट बुकलेटची रचना उजव्या हाताने लिहिणाऱ्यांचा विचार करून केली जात असे, ज्यामुळे डाव्या हाताने लिहिणाऱ्यांना रफ कामासाठी वारंवार पाने उलटून शेवटी जावे लागायचे. यंदा एनटीएने नवीन संकल्पना आणली आहे. नव्या रचनेनुसार, रफ वर्कची २ पाने बुकलेटच्या सुरुवातीला म्हणजेच ‘इन्स्ट्रक्शन पेज’च्या (Instruction Page) लगेचच नंतर जोडली गेली आहेत. त्यामुळे डाव्या हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार शेवटच्या पानावरील रफ वर्ककडे हात न्यावा लागणार नाही.
महत्त्वाची टीप: एनटीएने उमेदवार आणि पालकांना कडक सूचना दिली आहे की, त्यांनी केवळ एनटीएच्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in आणि त्यांच्या व्हेरिफाइड चॅनेलवर दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये.






