फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी पदवी पुरेशी नसून त्यांच्याकडे कौशल्य असणे ही गरजेचे आहे. या पदवी आणि कौशल्याच्या जोरावर ते उत्तम करिअर करु शकतात. यासाठीच राज्यसरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक-युवतींना होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 1000 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरु होणार आहेत. त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिनांक 20 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वर्धा येथे या कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करतील त्याचबरोबर राज्यातील अन्य भागातील केंद्रांचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित असणार आहेत.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची संकल्पना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली. राज्यातील कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये कौशल्य विकास व्हावे यासाठीच 1000 महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे सुरु केली जात आहेत. त्यामुळे शहरातील आणि गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला याचा प्रचंड फायदा होणार आहे. या अंतर्गत दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयातील केंद्रामध्ये 150 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा पध्दतीने प्रत्येक महाविद्यालयात प्रशिक्षणानुसार वर्षभरात तब्बल दीड लाख तरुणांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक- युवतींना उपलब्ध होणार
आचार्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये 200 ते 600 तासांचे म्हणजेच साधारणत: 3 महिन्यांचे National Skills Qualification Framework (NSQF) सुसंगत असलेले अल्प मदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेवून उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक- युवतींना उपलब्ध होणार आहेत.
या केंद्रांमुळे रोजगारनिर्मिती वाढणार आहे. त्यामुळे महाविद्यालयातील युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे आणी कौशल्य विकसित करावे. ज्यामुळे स्थानिक पातळीवरच नव्हे तर मोठ्या पातळीवरही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.