फोटो सौेजन्य- सोशल मीडिया
Edybites Startup Rupesh Sanghavi Edible Millet Spoons : अनेक लोक आपले पूर्ण आयुष्य एकाच करिअरमध्ये घालवतात. पण काही लोक असेही असतात जे समाजासाठी काहीतरी मोठे करण्याचा निर्णय घेतात. रुपेश के. संघवी यांची कथा अशीच आहे. त्यांनी सुमारे १७ वर्ष एव्हिएशन आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम केले. मलेशिया एअरलाइन्स, फ्लायदुबई, मालिंडो एअर आणि कुवेत एअरवेज यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी महत्वाच्या पदावर काम केले. या दरम्यान त्यांना आढळले की, हजारो लोक प्लास्टिक उत्पादने वापरतात. हा प्लास्टिक कचरा पर्यांवरणाला हानी पोहचवतो. त्यामुळे अनेकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते. म्हणून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी फक्त गप्पा मारून चालणार नाही तर त्यावर प्रत्यक्ष काम करायला हवे. त्यांच्या याच विचारातून त्यांनी ‘एडिबाईट्स’ (Edybites) नावाचा स्टार्टअप सुरू केला.
या ‘एडिबाईट्स’ (Edybites) स्टार्टअप उद्देश प्लास्टिकचा वापर कमी करणे नसुन असे प्रॉडक्ट तयार करणे, जे निसर्गासाठी फायदेशीर ठरतील हा होता. त्यांनी बाजरीपासून असे चमचे तयार केले जे, वापरल्यानंतर फेकून देण्याची गरज नसते तर ते खाल्ले जाऊ शकतात. ही कल्पना केवळ अनोखीच नसून पर्यावरण पूरक आहे,ज्यामुळे प्रदुषण कमी करण्यास मदत होते.
रुपेश सांगतात की, एडिबाईट्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे ही कंपनी पर्यावरण पूरक उत्पादने तयार करते. सध्या त्यांचे हे मजबूत चमचे एअरलाइन्स, रुग्णालये, कॉर्पोरेट संस्था आणि इव्हेंट कंपन्यामध्ये वेगाने स्वीकारले जात आहेत. त्यामुळे प्लास्टिकला पर्याय उपलब्ध झाला आहे. रूपेश आपल्या व्यवसायाद्वारे पर्यावरणाशी समतोल साधून लोकांच्या गरजा पूर्ण करत आहे.
रुपेश के. संघवी यांची कथा हेच शिकवते की, बदलाची सुरुवात कोणत्याही वयात आणि कोणत्याही क्षेत्रातून केली जाऊ शकते. जर समस्येला संधीत बदलण्याचा दृष्टीकोन असेल तर साधी कल्पनाही मोठा प्रभाव पाडू शकते. एडिबाईट्स हा केवळ एक स्टार्टअप नसून व्यापार आणि पर्यावरण संरक्षण एकत्र चालू शकतात हा संदेश दोतो. एक असा चमचा जो कचरा बनत नाही तर अन्न बनतो, हेच या विचाराचे सर्वात मोठे यश आहे.






