मुंबई, १० जून २०२६:टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने शरयू टोयोटा यांच्या भागीदारीत सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम (टी-टीईपी) चे उद्घाटन केले. या उपक्रमाद्वारे भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या ध्येयांना पाठबळ देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन स्थापन केलेले प्रशिक्षण केंद्र सीएसएमएसएस संस्थेचे अध्यक्ष रंजीत पी. मुलाय, सचिव पद्माकर एच. मुलाय, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जी. देशमुख, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. शशिकांत आर. डिकले, सीएसएमएसएस छ. शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. गणेश बी. डोंगरे, शरयू टोयोटाचे संचालक नसीर मानेर तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र तांत्रिक शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि उद्योगातील अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे, विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
‘टोयोटा किर्लोस्कर मोटर्स’, भारत आणि जपानच्या ऑटो क्षेत्रातील संयुक्त उपक्रमाची वाटचाल
टी-टीईपी अभ्यासक्रमात शैक्षणिक शिक्षणासोबत टोयोटा डीलरशिपमध्ये इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये सर्व्हिस अॅडव्हायझर आणि सेल्स कन्सल्टंट या प्रवाहांवर विशेष भर दिला जात आहे, ज्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सहा तांत्रिक शाखांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि वार्षिक 480 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. केंद्रात आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असून त्यात इंजिन मॉडेल्स, घटकांचे कट-सेक्शन, सिम्युलेटर आणि साधने आहेत. या सर्व सुविधा टोयोटाच्या हायब्रिड व सर्व्हिस तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात. याशिवाय बॉडी अँड माइंड ट्रेनिंग – कल्चर डेव्हलपमेंट साहित्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.
शरयू टोयोटाचे संचालक नासिर मणेर म्हणाले, “टी-टीईपी सुविधा ही केवळ प्रशिक्षण केंद्र नाही, तर ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक लॉन्चपॅड आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण साधन आणि स्थानिक संधी यांचा संगम करून आम्ही विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स व गव्हर्नन्स) विक्रम गुलाटी म्हणाले, “टी-टीईपी सारख्या उपक्रमांद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन आत्मविश्वास, कौशल्य आणि उद्देशाने सक्षम बनवू इच्छितो. हे नवीन केंद्र, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर येथे, सर्वसमावेशक विकास साधण्याचे आणि भारताच्या कौशल्य परिसंस्थेला तळापासून बळकट करण्याचे आमचे ध्येय प्रतिबिंबित करते.”
टोयोटा किर्लोस्कर मोटरने कौशल्य विकासासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि टी-टीईपी सारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाशी संलग्न प्रशिक्षण दिले जाते. २००६ मध्ये सुरू झालेल्या टी-टीईपी कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत भारतभरात १४,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी ७०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशातील ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या आणि अधिकृत डीलरशिपमध्ये रोजगार मिळवला आहे.






