भारतातील प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो आपल्या इलेक्ट्रिक व्हेईकल पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. ‘चेतक’ ई-स्कूटर आणि थ्री-व्हीलर्सच्या यशानंतर, कंपनी आर्थिक वर्ष २०२८ मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारात आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीच्या ‘Q1 FY27’च्या आर्थिक निकालांच्या घोषणेदरम्यान ही माहिती देण्यात आली.
‘चेतक‘च्या वाढत्या मागणीमुळे उत्पादन क्षमतेत वाढ
एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत बजाजच्या एकूण देशांतर्गत व्यवसायापैकी जवळपास ३० टक्के हिस्सा इलेक्ट्रिक वाहनांचा होता. ‘चेतक’ स्कूटरला बाजारात मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता पुरवठ्याचा तुटवडा दूर करण्यासाठी कंपनी पुढील काही महिन्यांत चेतकचे मासिक उत्पादन ५०,००० युनिट्सवरून ६०,००० युनिट्सपर्यंत वाढवणार आहे. गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या ई-व्हिएकल व्यवसायातील महसूल जवळपास दुप्पट झाला आहे.
बजाज ऑटोची सर्वकालीन उच्च आर्थिक कामगिरी
एप्रिल-जून २०२६ च्या तिमाहीत बजाज ऑटोने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा कार्यचालन महसूल ३७ टक्क्यांनी वाढून ₹१७,२४४ कोटी झाला आहे, तर करोत्तर नफा ४० टक्क्यांहून अधिक वाढून जवळपास ₹३,००० कोटींवर पोहोचला आहे. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील वाढत्या मागणीमुळे कंपनीने पहिल्यांदाच ७ लाखांहून अधिक वाहनांच्या जागतिक निर्यातीचा टप्पा पार केला आहे.
हिरो मोटोकॉर्पची अॅथर एनर्जीमध्ये १,००० कोटींची मोठी गुंतवणूक; नव्या ई-स्कूटर्स येणार बाजारात
‘पल्सर‘ श्रेणीत सुधारणा आणि प्रीमियम बाइकचा दबदबा
कंपनी लवकरच १२५ सीसी ते १६० सीसी सेगमेंटमधील लोकप्रिय पल्सर (Pulsar) रेंजमध्ये नवीन अपडेट्स आणि सुधारणा आणणार आहे. दुसरीकडे, ‘केटीएम’ (KTM) आणि ‘ट्रायम्फ’ (Triumph) या प्रीमियम ब्रँड्सचा देशांतर्गत महसूल ६० टक्क्यांनी वाढला असून, नवीन ३५० सीसी पोर्टफोलिओ आणि ‘ट्रायम्फ ट्रॅकर ४००’ मुळे या सेगमेंटला मोठी गती मिळाली आहे.






