फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Old Railway Ticket Sprocket Holes: आजच्या काळात तिकिटे मोबाईलवर क्यूआर कोड (QR Code) आणि डिजिटल स्वरूपात सहज मिळतात. पण एक काळ असा होता, जेव्हा रेल्वे स्थानकांवर छोट्या कागदी तिकिटांचे राज्य होते. तुम्ही जुनी तिकीटे पाहिली तर तुम्हाला नजरेस पडेल की तिकीटाच्या दोन्ही बाजूंना लहान लहान छिद्रे (holes) असायची. परंतु, ही छिद्रे का असायची हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया या छिद्रांमागचे रहस्य….
जुन्या रेल्वे तिकिटांच्या कडांवर असलेल्या या लहान छिद्रांना तांत्रिक भाषेत ‘स्प्रॉकेट होल्स’ असे म्हणत. ज्याचा वापर ‘डॉट-मैट्रिक्स’ (Dot-Matrix) प्रिंटरद्वारे केला जात असे. हे ‘स्प्रॉकेट होल्स’ (Sprocket Holes) तिकिट देण्याची प्रक्रिया वेगवान व सुव्यवस्थित ठेवण्यास मदत करत असत. त्यावेळी ही तिकीटे सलग चालणाऱ्या पेपर रोलवर छापली जायची.
प्रिंटरच्या आत असलेली दातेरी चाके या स्प्रॉकेट होल्समध्ये अचूकपणे अडकून कागदाला पुढे ढकलत असत. यामुळे कागद अजिबात घसरत नसे आणि प्रत्येक तिकिटावर ठरलेल्या जागेवरच प्रिंट व्हायचे. जर ही छिद्रे नसती तर कागद मशिन्समध्ये सरकू शकला असता. ज्यामुळे ट्रेन नंबर, स्टेशनचे नाव, भाडे आणि प्रवासासंबंधित इतर माहिती चुकीच्या ठिकाणी छापली गेली असती. याच कारणामुळे तिकिटाच्या अचूक छपाईसाठी ही छिद्रे आवश्यक मानली जात होती.
काळाच्या ओघात रेल्वेने आधुनिक तिकिट प्रणाली आणि नवीन छपाई तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. थर्मल प्रिंटर (Thermal Printer) आणि डिजिटल तिकीटिंग आल्यावर सलग चालणाऱ्या कागदांची गरज संपली. नवीन मशीनला स्प्रॉकेटहोल्स असलेल्या कागदांची आवश्यकता न उरल्याने तिकिटांच्या कडावरची छिद्रे नाहीशी होऊ लागली. आज जरी ही तिकीटे आपण वापरत नसलो तरी हा एक रेल्वे प्रवांशासाठी जुन्या आठवणींचा भाग आहे, जी छिद्रे कधीकाळी गरज होती.






