संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वाचतावरण पसरत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (११ एप्रिल) रोजी पहाटे ४:५० च्या सुमारास ही घटना घडली आहे.
विवेक ऊर्फ विकी विनोद सोनकांबळे (वय १९, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी), जुबेर नासीर शेख (वय ३०), श्रवण ऊर्फ सुरज शाहजी कुऱ्हाडे (वय २० दोघेही रा. पीसीएमसी वसाहत, निगडी) आणि त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विवेक सोनकांबळे आणि जुबेर शेख या दोघांना अटक केली आहे. प्रसाद नंदकुमार बहुले (३०, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी संगणमत केले. पहाटेच्या वेळी आरोपींनी प्रसादला गाठून “तुला जिवंत सोडत नाही” असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या किरण काळे याच्या हातावरही आरोपी जुबेरने कोयत्याने वार केला. उर्वरित दोन आरोपींनी शौचालयाच्या तुटलेल्या पट्टीने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी परिसरात हत्यारे फिरवून “आम्ही येथील भाई आहोत” अशी ओरडाओरड करत दहशत निर्माण केली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश
मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या
नांदेडमधून एक मोठी बातमी बातमी समोर आली आहे. नांदेड शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या एका हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली आहे. सोनू कल्याणकर (वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो श्रीनगर परिसरातील रहिवासी होता. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला होता. श्रीनगर मार्गावरून जात असताना तीन ते चार जणांनी त्याला घेरले आणि पोट व पाठीत वार करत गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला.






