संग्रहित फोटो
पिंपरी : खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथील दोंद वस्ती परिसरात मोटारसायकलची चावी काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण चार जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शनिवारी (६ जून) दुपारी ४ ते सायंकाळी ५:३० दरम्यान घडली आहे.
पहिल्या घटनेत बालाजी दत्तात्रय मोहिते (वय ३३, रा. कोरेगाव खुर्द, खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भीमराव बाळू दोंद (वय ३५) आणि नकुल बाळू दोंद (वय ३१, दोघे रा. दोंद वस्ती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे वडील कोरेगाव फाटा येथे गेले असता आरोपी भीमराव दोंद यांनी त्यांच्या दुचाकीची चावी काढून शिवीगाळ व मारहाण केली. यानंतर याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी बालाजी मोहिते व त्यांचा भाऊ सौरभ मोहिते हे आरोपींच्या घरी गेले असता त्यांच्यावर लोखंडी पाइपने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सौरभ मोहिते यांना कानामागे गंभीर दुखापत होऊन सहा टाके पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
लाकडी काठी व रॉडने मारहाण
दरम्यान, या प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादही दाखल करण्यात आली आहे. भीमराव बाळू दोंद (वय ३५, कोरेगाव खुर्द) यांनी बालाजी दत्तात्रय मोहिते आणि सौरभ दत्तात्रय मोहिते (दोघे रा. मोहिते वस्ती, कोरेगाव खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भीमराव दोंद यांच्या म्हणण्यानुसार, चावीच्या वादातून फिर्यादी व त्यांचे साथीदार त्यांच्या घरासमोर आले आणि शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी काठी व रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत हस्तक्षेप करण्यासाठी आलेले त्यांचे भाऊ नकुल दोंद यांच्यावरही हल्ला करण्यात आला असून त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच डावा हात कोपऱ्याजवळ फ्रॅक्चर झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून
आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या खुनाची धक्कादायक घटना शुक्रवारी ( दि. ५) पहाटे उघडकीस आली आहे. दरम्यान, या खुनानंतर आरोपीने सोशल मीडियावर ‘वन मॅन शो कसा ठोकला’ अशा आशयाचे स्टेटस बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घोडेगाव पोलिसांनी एका विद्यार्थ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.






